हायलाइट्स:
- १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेन सुरू करण्याची घोषणा
- मनसेनं उपरोधिक शब्दांत केलं मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन
- मुख्यमंत्र्यांनी मंत्रालयात जावं यासाठी आंदोलन करायचं का? – मनसे
मुंबई: कोविड लसीचे दोन डोस घेतलेल्या मुंबईकरांना येत्या १५ ऑगस्टपासून लोकल ट्रेननं प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल ही घोषणा केली. आता त्या निर्णयावरूनही राजकीय टीका-टिप्पणी सुरू झाली आहे. भाजपच्या आंदोलनामुळंच राज्य सरकार झुकल्याचा टोला आमदार नीतेश राणे यांनी हाणल्यानंतर आता मनसेनंही मुख्यमंत्र्यांवर खोचक शब्दांत टीका केली आहे.
मुंबईतील लोकल ट्रेन सुरू व्हावी म्हणून गेल्या अनेक दिवसांपासून राज्य सरकारकडं मागण्या केल्या गेल्या होत्या. विरोधी पक्षांनी आंदोलनं केली. लोकलअभावी लोकांचे कसे हाल होत आहेत याबाबतच्या बातम्या माध्यमांतून आल्या. न्यायालयात याचिका देखील करण्यात आल्या. चहूकडून दबाव वाढल्यानंतर अखेर राज्य सरकारनं लोकल ट्रेन सुरू करण्याबाबत निर्णय जाहीर केला आहे.
वाचा:मुख्यमंत्र्यांच्या लोकलबाबतच्या घोषणेनंतर नीलेश राणे म्हणाले…
मुख्यमंत्र्यांच्या या घोषणेनंतर मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी ट्वीट केलं आहे. ‘आंदोलनं, याचिका, पत्र, विनंती, त्रागा, धमकी, बातमी लावून धरणं आणि इतर अनेक उपाय या माध्यमातून लोकल १५ ऑगस्टला चालू करण्याची आपण घोषणा केली. असो, आपलं अभिनंदन. आता आपण मंत्रालयात बसून लोकांचे प्रश्न येत्या १५ ऑगस्टपासून सोडवाल यासाठी याचिका करू की आंदोलन? हेही सांगा,’ असा टोला संदीप देशपांडे यांनी हाणला आहे.
करोनाची महामाही सुरू झाल्यापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे क्वचितच मंत्रालयात गेले आहेत. बहुतेक बैठका, उद्घाटने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारेच घेण्यावर मुख्यमंत्र्यांचा भर राहिला आहे. त्यावरून विरोधकांनी वेळोवेळी त्यांच्यावर टीका केली आहे. मुख्यमंत्री घराबाहेर का पडत नाहीत, असा विरोधकांचा प्रश्न आहे. तोच धागा पकडून देशपांडे यांनी आपल्या ट्वीटमध्ये मंत्रालयाचा उल्लेख केला आहे. न्यायालयात याचिका किंवा आंदोलन केल्यानंतरच मुख्यमंत्री मंत्रालयात येतील का, असा प्रश्न देशपांडे यांनी उपस्थित केला आहे.
वाचा: लसीचा एक डोस घेतलेल्यांना लोकलमुभा का नाही?; मुंबईकरांचा सवाल