व्यवसाय व प्रशिक्षण संचालनालय गट – क संवर्गातील ऑनलाईन परीक्षा सुरू असताना, एका उमेदवाराला कॉपी करण्याच्या उद्देशाने इलेक्ट्रॉनिक उपकरणासह केंद्रप्रमुखांनी ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेला ‘डमी’ उमेदवार असल्याची माहिती समोर येताच, डमी उमेदवाराने परीक्षा केंद्रातून पळ काढला. डमी उमेदवार पळाला कसा? याचा शोध सुरू असताना, डमी उमेदवाराच्या जागेवर मुळ उमेदवार आसन क्रमांकावर येऊन बसला. ऑनलाइन परीक्षेत फसवणूक करणाऱ्या मूळ उमेदवार श्रीकांत सुखदेव केदारे (वय ३१, रा. खुल्ताबाद) याच्यासह राहुल नावाच्या डमी उमेदवाराच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात वैभव पांडुरंग पवार (वय ३२, रा. उल्कानगरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १६ एप्रिल रोजी सकाळी ८.३० ते १० वाजेच्या दरम्यान व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय गट क संवर्गातील परीक्षार्थींचे हॉल तिकीट पाहून सोडण्यात आले. या परीक्षेसाठी १७२ परीक्षार्थ्यांमधून १२७ हजर होते. पेपर सुरू असताना, केंद्र प्रमुख मनोज अंबाडे हे परिक्षा हॉलमध्ये निरिक्षण करत असताना, एक परिक्षार्थी संशयीतरित्या आढळुन आला. या परीक्षार्थ्याची तपासणी केली असता, सदर उमेदवाराकडून चार हजार रूपये किंमतीचे एटीएम ट्रान्समिटर, ब्ल्यू टूथ डिव्हाइस, एक हजार रुपये किमतीचे माईस्पाय, दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असे आढळून आले. या परिक्षार्थीकडे सापडलेल्या कागदपत्रावर असलेला उमेदवाराचा फोटो आणि परिक्षार्थीजवळ असलेलया हॉल तिकीटावर असलेला फोटो वेगळा असल्याची माहिती समोर आली.
या प्रकरणात केंद्र प्रमुखांनी संबंधित उमेदवाराला ताब्यात घेऊन बाहेर आले असता, हा डमी उमेदवार परीक्षा केंद्रातून पळून गेला. काही वेळाने परीक्षा केंद्रात आसन क्रमांक ५० वर एक अन्य व्यक्ती येऊन बसला. ही व्यक्ती मूळ उमेदवार असल्याचे दिसून आले. श्रीकांत केदारे याला ताब्यात घेऊन पळून गेलेल्या व्यक्तीबाबत विचारणा केली असता, त्याने त्या मुलाचे नाव राहुल असल्याचे सांगितले.
केंद्राचे कर्मचारीही बनवेगिरीत सहभागी असल्याचा संशय
सदर परिक्षा केंद्रात परिक्षा सुरू होण्यापुर्वी संबंधीत कर्मचारी उमेदवारांची तपासणी करित असतात. वेगवेगळ्या कामांसाठी वेगवेगळे कर्मचारी तैनात आहेत. असे असताना डमी उमेदवार हा इलेक्ट्रीक उपकरणांसह केंद्रात आला. तसेच डमी उमेदवाराला पकडल्यानंतर तो परिक्षा केंद्रातून पळण्यात यशस्वी झाला. ऐवढेच नव्हे तर मुळ उमेदवार श्रीकांत केदारे हा परिक्षा केंद्रात येऊन बसलाही यामुळे या परिक्षा केंद्रातील काही कर्मचारी या बनवेगिरी सहभागी असल्याची शक्यता तक्रारीत नमुद करण्यात आली आहे.