शिक्षक भरती प्रक्रियेबाबत सरकारने घोषणा केली. मात्र, रिक्त जागा, प्रक्रिया याकडे राज्यातील लाखो विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे. आगामी भरतीमध्ये प्रत्येक प्रवर्गाला त्यांच्या आरक्षणाच्या प्रमाणात जागा द्या, असा आग्रह विद्यार्थ्यांचा आहे. पात्रताधारक विद्यार्थी लोकप्रतिनिधींची भेट घेऊन मागणी करीत आहेत.
शिक्षण विभागाकडून काही दिवसांत पवित्र प्रणालीमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवणार आहे. राज्यात विद्यार्थ्यांना विशेषत: ग्रामीण भागांतील जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मागील शिक्षक भरतीमध्ये अनेक प्रवर्गाला काही जिल्ह्यांत जागा कमी होत्या. जागा उपलब्ध नव्हत्या. आगामी भरती प्रक्रियेत असे प्रकार टाळले पाहिजेत, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
जागा भरताना प्रत्येक प्रवर्गाला त्यांच्या टक्केवारीनुसार जागा उपलब्ध करून द्याव्यात, अशीही मागणी विद्यार्थ्यांमधून होत आहे. भरती प्रक्रिया तत्काळ सुरू करावी, रिक्त जागा, बिंदू नामावलीचे नियम पूर्ण करून याबाबत स्पष्टता यावी, सर्व प्रवर्गांना रिक्त जागांमध्ये संधी द्या, असे सांगून पात्रताधारकांनी लोकप्रतिनिधींची भेट घेत आहेत. अशाच काही विद्यार्थ्यांनी जिल्ह्यातील विविध पक्षांच्या नेत्यांची भेट घेत आग्रही मागणी केली. शिक्षक भरतीची प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर शाळांना शिक्षक मिळतील व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळता येईल, असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
‘पवित्र’ची२०१७ चीच प्रक्रिया अपूर्ण
राज्यात २०१७ मध्ये पवित्र पोर्टलद्वारे भरती प्रक्रिया सुरू झाली. बारा हजार शिक्षकांची पदे भरण्यात येतील असे सांगण्यात आले. पाच वर्षे उलटूनही ही प्रक्रिया अपूर्ण आहे. त्यामुळे नवीन भरती प्रक्रिया कधी, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तीन महिन्यांत भरती प्रक्रिया करण्यात येईल, असे सरकारकडून सांगण्यात आले. मात्र, अद्याप त्या प्रक्रियेबाबत स्पष्टता नाही. दुसरीकडे राज्यात डीटीएड, बीएडधारकांची संख्या दहा लाखांपेक्षा अधिक आहे. त्यात टीईटी, अभियोग्यता चाचणी परीक्षा उत्तीर्ण असलेल्यांची संख्या ही मोठी आहे.
मागील वेळी पवित्र पोर्टलवर झालेल्या शिक्षक भरतीमध्ये अनेक जिल्हा परिषदेत शिक्षक भरती होऊनदेखील त्या ठिकाणी ईडब्ल्यूएस, एसईबीसी, खुला अशा अनेक प्रवर्गांना शून्य जागा दिसत होत्या. त्यामुळे या प्रवर्गाच्या उमेदवारांना अर्ज करता आला नाही. या वेळी अशी परस्थिती असू नये. कोणत्याही प्रवर्गावर अन्याय होऊ नये व विद्यार्थ्यांनादेखील तातडीने पात्रताधारक शिक्षक उपलब्ध व्हावेत. यामागणीबाबत आम्ही विद्यार्थी अनेकांची भेट घेतली.
– आशिष देशमुख, पात्रताधारक
पवित्र पोर्टल मार्फत सुरू असलेल्या शिक्षक भरतीत २०१७ मध्ये, अनेक प्रवर्गांना अल्प जागा होत्या. जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असतानाही असे चित्र होते. असे प्रकार होऊ नयेत आणि उमेदवारांवर पुन्हा अन्याय होऊ नये म्हणून पूर्ण टक्केवारीच्या तुलनेत योग्य जागा मिळाव्यात अशी आम्ही मागणी करीत आहोत.
– सुदाम थोरात, अभियोग्यता धारक