पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी शाळापूर्व तयारीच्या साहित्यात बदल करण्यात आले. यंदा आयडिया कार्ड, कृतीपत्रिकेऐवजी ‘व्हिडिओ’, ‘शाळापूर्व तयारी पुस्तिका’ माता पालक गटाला दिली जाणार आहे. सहा आठवड्यांत या माध्यमातून बालकांना अंक, भाषा ओळख करून दिली जाणार आहे. निधी नसल्याने ‘शाळापूर्व तयारी, पहिले पाऊल’ अभियान लांबणीवर पडले, आठ आठवड्यांचा कालावधी यंदा सहा आठवड्यांवर आल्याची चर्चा आहे.
करोनाच्या प्रादुर्भावात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी शाळापूर्व तयारी अभियान राबविण्यात येते. पहिलीत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची प्राथमिक स्तरावरील संपादणूक वाढावी, यासाठी अभियानातून प्रयत्न करण्यात येते. जून २०२३ मध्ये पहिलीत दाखल होणाऱ्या बालकांसाठी अभियानाची आखणी करण्यात आली. जिल्हास्तरावरील शिक्षकांचे प्रशिक्षण झाले. तालुकास्तरावरील प्रशिक्षण मंगळवारी होणार असून, २७ एप्रिल रोजी पहिला मेळावा होणार आहे.
यंदा यासाठीच्या शैक्षणिक साहित्यात काहीसे बदल करण्यात आले. यामध्ये आयडिया कार्डऐवजी आयडिया व्हिडिओ असणार आहेत. यासह कृती पुस्तिका, विकास पत्र असणार आहे. स्वयंसेवक, शिक्षक, माता पालक गटाला याद्वारे बालकांची तयारी करून घ्यायची आहे.
दोन हजारांपेक्षा अधिक शाळा
शाळापूर्व तयारीत यंदा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जिल्हा परिषद, महापालिका, नगरपालिका, समाजकल्याण, आदिवासी विभागाच्या अशा दोन हजार १५० शाळा सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येते. मागील वर्षी अभियानात सहा हजार माता पालक गट सहभागी होते. उपक्रमातून जिल्ह्यातील ३६ हजार ५९ बालकांना याचा लाभ झाला.
अशी तयारी करून घेतली जाणार
उपक्रमाद्वारे बालकांचा शैक्षणिक, भौतिक, मानसिक पातळीवर सर्वांगीण विकास व्हावा, या हेतूने शिक्षण विभागाकडून आयडिया व्हिडिओ, शाळापूर्व तयारी पुस्तिका तयार करण्यात आल्या. यामध्ये अंक, भाषा विकास, सामाजिक आणि भावनात्मक विकास, गणन पूर्व तयारी असे विविध टप्पे असणार आहेत. ज्यामध्ये अक्षर, लेखन, भाषा, अंक ओळख करून दिल्या जाते. यंदा आठ आठवडे ऐवजी सहा आठवड्यांचा कालावधी असणार आहे. प्रत्येक विद्यार्थ्याचे विकासपत्र असेल. ज्यात त्याची शैक्षणिक प्रगती नोंदवली जाणार आहे.
अभियानात प्रशिक्षणाची प्रक्रिया सुरू झाली. एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात पहिला मेळावा होईल. आयडिया व्हिडिओ माता पालक गटात पाच ते सात पालकांचा समावेश असेल. एक प्रमुख असेल, त्यांना आयडिया व्हिडिओ, पुस्तिका पाठवून बालकांची शैक्षणिक तयारी करून घेतली जाणार आहे. जिल्ह्यात सहा हजारपेक्षा अधिक गट असतील. विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शाळेत येण्यापूर्वी शाळेची ओळख होईल.
– डॉ. वैशाली जहागीरदार, वरिष्ठ अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था