प्रकट दिन आणि पुण्यतिथी
महाराष्ट्रात गाणगापूर येथील अक्कलकोट हे देशा- परदेशातील स्वामी भक्तांसाठी महत्त्वाचं स्थळ आहे. वर्षभर भाविक येथे स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी येतात. दरम्यान चैत्र शुद्ध द्वितीया हा दिवस श्री स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन म्हणून ओळखला जातो. तर चैत्र वद्य त्रयोदशीच्या दिवशी अक्कलकोट येथील ‘वटवृक्ष समाधी मठ स्थानी’ माध्याह्न समयी त्यांनी आपल्या अवतारकार्याची समाप्ती केली.
या पुण्यतिथी दिनी श्रीदत्त क्षेत्र औदुंबर येथे भगवान नृसिंह सरस्वती स्वामींच्या विमल पादुकांवर सध्या शितोपचार म्हणून प्रतिवर्षाप्रमाणे चालणारी गंधलेपन पुजा चालू झाली आहे. तसेच या कालावधीमध्ये श्री स्वामी समर्थ पुण्यतिथी निमित्त अखंड नाम जप यज्ञ सप्ताह सुरु झाले आहे, ज्यांना शक्य असेल त्यांनी गुरुचरित्र पारायणला नक्की बसावं तसेच अतिउच्च कोटीची प्रहर सेवेमध्ये नक्की सहभाग घ्यावा असे श्री स्वामी समर्थ केंद्रात सांगण्यात येते. करोडो लोकांना प्रहर सेवेचे अप्रतिम अनुभव आले आहेत, प्रत्येकाने प्रहर सेवा करावीच पण त्यासोबत कमीत कमी ५ तरी नवी व्यक्तींना आपल्यासोबत प्रहर सेवेला नक्की घेऊन जावे असा अनुभव देखील सांगितला जातो.
श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी सेवाकार्य
स्वामी समर्थ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त फाल्गुन वद्य त्रयोदशी ते चैत्र वैद्य त्रयोदशी असा सलग महिनाभर मठात पवमान सुक्ताचा अभिषेक सोहळा होतो. श्री स्वामी समर्थ महाराज पुण्यतिथी निमित्त गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे व चंद्रकांत दादा यांच्या आदेशाने अखंड स्वामीनाम जप यज्ञ सप्ताह व सामूहिक गुरुचरित्र पारायण सोहळा आयोजिला आहे. या सप्ताह काळात नवनाथ पारायण, अखंड स्वामीनाम जप, अखंड दोन विना वादन, अखंड दोन स्वामी चरित्र पठणासह गणेश याग, मनोबोध याग, गीताई याग, चंडी याग, स्वामी याग, रुद्र याग, मल्हारी याग, तसेच रोज नित्यस्वहाकार व त्रिकाल आरतीसह सायंकाळी टाळमृदुंगाच्या गजरात औदुंबर प्रदक्षिणा व विष्णुसहस्त्रनाम, गिताई, मनाचे श्लोक, पसायदान, तुकाराम अभंग आदी धार्मिक कार्यक्रम घेण्यात येतात. पुण्यतिथीच्या दिवशी महानैवेद्य व महाआरती नंतर आयोजित महाप्रसाद वाटप करण्यात येतो. पंचक्रोशीतील भाविक या महाप्रसादाचा लाभ घेतात.