जिल्ह्यात प्रस्तावित १०० मॉडेल स्कूलच्या इमारतींच्या बांधकामाचा श्रीगणेशा झाला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात ‘इम्पथी’ या मुंबईस्थित सामाजिक संस्थेच्या सहकार्याने एकूण उभारण्यात आलेल्या ५४ इमारतींपैकी ११ इमारती या ‘मॉडेल स्कूल’साठी वापरण्यात येणार आहेत.
या प्रकल्पातील सहयोगी सामाजिक संस्थेने केवळ इमारत बांधकामाची जबाबदारी घेतली असून, शाळेतील अध्यापनाचा दर्जा, गुणवत्ता सुधार आदी उपक्रमांसाठी जिल्हा परिषदेचा शिक्षण विभागच जबाबदार असणार आहे. नुकतेच निफाड तालुक्यातील खडक माळेगाव येथील शाळेचे उद्घाटन करण्यात आले.
निफाडसह बागलाण, चांदवड, इगतपुरी, सिन्नर, मालेगाव, नांदगाव, सुरगाणा, येवला आदी तालुक्यांमध्ये अकरा ठिकाणी मॉडेल स्कूलसाठी इमारतींची उभारणी करण्यात आली आहे.
शहरी भागांप्रमाणे ग्रामीण भागातही अद्ययावत शाळा असाव्यात यासाठी पालकमंत्री दादा भुसे यांच्या सूचनेनुसार नाशिक जिल्हा परिषदेने हा प्रकल्प हाती घेतला आहे. यानुसार जिल्हा परिषदेकडील काही योजनांच्या आधारासह लोकसहभाग, सामाजिक संस्थांचे बळ आणि गरज पडेल तेथे जिल्हा नियोजन समितीकडून निधीची जोड देऊन या शाळा उभारण्यात येत आहेत.
स्कूलमधील वेगळेपण काय?
मॉडेल शाळांचा आराखडा सामान्य शाळांप्रमाणेच असेल. मात्र, संबंधित तालुक्याच्या केंद्रस्थानी आणि जिल्ह्याच्या मुख्यालयाहूनही येथे पोहोचण्यासाठी कनेक्टिव्हिटी असेल अशाच गावांची निवड या शाळांची उभारणी करण्यासाठी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा भाषिक अडसर दूर करण्यासाठी मॉडेल शाळा सेमी इंग्रजी माध्यमातून चालविली जाईल. येथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना ई-प्रणालीद्वारे बहुतांश अध्यापन केले जाईल. त्यासाठी इंटरनेटसह प्रोजेक्टर, इ-क्लासरूम, संगणक लॅब, टॅब, डिजीटल बोर्ड, स्मार्ट टीव्ही आदी सुविधा देण्यात येतील. ग्रामीण भागात वीज स्वावलंबनासाठी शाळेत सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला जाणार आहे.
सव्वादोनशे शिक्षकांचे प्रशिक्षण
या शाळांमध्ये गुणवत्ता जपली जावी यासाठी अध्ययन प्रक्रियेसह अध्यापनावर विशेष भर दिला जाणार आहे. याकरिता नुकतेच जिल्हाभरातून सुमारे तीन हजारांवर शाळांमधून निवडण्यात आलेल्या २२५ शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले. पारंपरिक शिक्षणासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगिण विकास व्हावा, यासाठी या प्रशिक्षणात शिक्षकांना धडे देण्यात आले.
जिल्ह्यात आतापर्यंत ११ मॉडेल स्कूलच्या इमारतींचे बांधकाम झाले आहे. मुंबईस्थित ‘इम्पथी’ या सामाजिक संस्थेनेही इमारत बांधणी कामासाठी सहकार्य केले आहे. लोकसहभागाचाही आधार या प्रकल्पास मिळतो आहे.
– भगवान फुलारी, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिप.
आमच्या संस्थेमार्फत राज्यभरात शासनाच्या २४६ शाळांच्या इमारती उभारण्यासाठी योगदान देण्यात आले आहे. नाशिक जिल्ह्यात यातील ५४ शाळा असून, यातील ११ शाळा नाशिक जिल्हा परिषद मॉडेल स्कूलला देणार आहेत.
– दिनेश जोरे, व्यवस्थापक, इम्पथी सामाजिक संस्था, मुंबई