छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी) यांच्यातर्फे राज्यातील युवकांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविला जातो. या शिक्षणक्रमाज उमेदवार निवडीसाठी सारथी-पुणे-एमपीएससी-सीईटी २०२३ ही प्रवेश परीक्षा घेण्याज आली होती. या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, ७५० विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या उमेदवारांना मोफत कोचिंग योजनेचा लाभ मिळणार आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणाऱ्या राज्य सेवा परीक्षेविषयक मार्गदर्शन करण्यासाठी उमेदवारांना सारथीच्या माध्यमातून तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाते. मराठा, कुणबी, मराठा-कुणबी प्रवर्गातील उमेदवारांना या माध्यमातून संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. प्रारंभी प्रवेश परीक्षेसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले होते.
१२ फेब्रुवारी रोजी परीक्षा घेण्यात आली होती. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, अमरावती, कोल्हापूर आणि औरंगाबाद येथील केंद्रांवर ऑनलाइन पद्धतीने ही परीक्षा झाली. या परीक्षेतून अंतिमतः प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या निकालात ७५० उमेदवारांची राज्यस्तरीय गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे.
गुणवत्ता यादीत स्थान मिळवून यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना राज्यसेवा परीक्षेविषयी मोफत मार्गदर्शन सुविधा मिळणार आहे. या उमेदवारांना निःशुल्क कोचिंगचा लाभ मिळणार असून, कोचिंग शुल्क सारथीमार्फत कोचिंग संस्थांना अदा केले जाणार आहे.