सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या (पीजी कोर्सेस) परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन मूल्यांकन करण्यासाठी निविदा प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे ऑनलाइन मूल्यांकन प्रक्रियेला वेग आला असून, परीक्षेपूर्वी ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासण्याची यंत्रणा कार्यान्वित होण्याची चिन्हे आहेत. सत्र परीक्षांचा निकाल लवकर प्रसिद्ध होऊन, आगामी शैक्षणिक वर्षाची सुरुवात एक ऑगस्टपासून होण्यासाठी उत्तरपत्रिकांचे ऑनलाइन पद्धतीने मूल्यांकन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठात उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन ऑनलाइन पद्धतीने करण्यात येते. त्यामुळे निकाल एक महिन्याच्या आत जाहीर होतो. त्याच धर्तीवर निकाल जलद जाहीर व्हावेत आणि शैक्षणिक सत्र पूर्वपदावर येण्यासाठी पुणे विद्यापीठाने पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिका ऑनलाइन पद्धतीने तपासणीसाठी पाऊल उचलले आहे.
परीक्षेच्या उत्तरपत्रिका स्कॅन करून, त्या प्राध्यापकांना कम्प्युटर किंवा लॅपटॉपच्या स्क्रीनवर ऑनलाइन पद्धतीने तपासता येईल. त्यामुळे विद्यापीठाची शैक्षणिक सत्रातील विस्कळित झालेली घडी पूर्वपदावर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
त्यादृष्टीने विद्यापीठाने उत्तरपत्रिकांच्या ऑनस्क्रीन मूल्यमापनासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. येत्या महिनाभरात ही संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होऊन, खासगी कंपनीची निवड करण्यात येणार आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात सत्र परीक्षा सुरू होत आहे. परीक्षा सुरू होतील, त्यावेळेपासून ऑनलाइन उत्तरपत्रिका तपासणीची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे वेळेत निकाल लागेल.
त्याचप्रमाणे ऑनलाइन तपासणी असल्याने निकालानुसार गुणपत्रिकेची छपाईही वेळेपूर्वीच होणार आहे, अशी माहिती पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाकडून देण्यात आली आहे.