अक्षय्य तृतीया सण का आहे इतका खास, जाणून घेऊया याचे महत्व

आपल्या पंचांगाप्रमाणे सूर्योदयाची तिथी मानण्याची प्राचीन परंपरा असल्यामुळे अक्षय्य तृतीया २२ एप्रिल २०२३ रोजी साजरी केली जाणार आहे. या दिवशी सुरू केलेल्या कुठल्याही कार्याचा क्षय होत नाही असे म्हणतात शिवाय या दिवशी आपण ज्या वस्तुंचे दान करतो त्या अक्षय प्रमाणात म्हणजेच विपुल प्रमाणात पुन्हा आपल्याला मिळतात म्हणुन अक्षयतृतीयेचं विशेष महत्व समजल्या जातं. वैशाख मासातील शुक्ल पक्षातील तृतीया ही अक्षय तृतीया म्हणुन प्रसिध्द आहे. या दिवशी पाण्याचे दान करण्याचा देखील प्रघात आहे. या दिवसाला इतके महत्व का आहे जाणून घेऊया यासंबंधी आणखी काही गोष्टी.

दान व हवनाला महत्व

आपल्या प्राचीन संस्कृती, परंपरांमध्ये साडेतीन मुहूर्त अत्यंत महत्त्वाचे मानले गेले आहेत. त्यापैकी एक अक्षय्य तृतीया असल्यामुळे यालाही अनन्य साधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. श्रीकृष्णाने युधिष्ठिराला असे सांगितले होते की, या तिथीस केलेले दान व हवन क्षयाला जात नाही. म्हणून ही तिथी अक्षय्य मानली गेली आहे. देव आणि पूर्वज यांना उद्देशून या तिथीस जे कर्म केले जाते, ते सर्व अक्षय्य (अविनाशी) होते. जो मनुष्य या दिवशी गंगा स्नान करेल, तो सर्व पापांतून मुक्त होतो, अशी मान्यता आहे. या दिवशी विष्णूंचा सहावा अवतार परशुराम यांची पूजा करून त्यांना अर्घ्य दिले जाते.​

माठ आणि फळांचा राजा आंब्याला महत्व

वैशाख महिना हा अत्यंत उष्ण असतो. त्यामुळे अक्षय्य तृतीयेच्या निमित्ताने मातीचे माठ किंवा रांजण दान करावे. मातीच्या माठातील पाणी आरोग्यासाठी उत्तम राहते. तसेच फळांचा राजा आंबा प्रामुख्याने अक्षय्य तृतीयेपासून खाण्यास सुरुवात होते. अक्षय्य तृतीयेला केलेले नामस्मरण किंवा मंत्र पठण अखंड टिकून राहते, अशा मान्यता आहे. याशिवाय अक्षय्य तृतीयेच्या दिवशी अन्नपूर्णा देवी प्रकट झाली होती, असेही सांगितले जाते.

या घटना याच दिवशी घडल्या

अक्षय्य तृतीयेपासून त्रेतायुगाचा प्रारंभ झाला, असे मानले जाते. अक्षय्य तृतीयेपासून चारधाम मानल्या गेलेल्या बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्रीची द्वारे खुली केली जातात. याच दिवशी नर-नारायण आणि परशुराम यांचे अवतरण झाले होते, अशी मान्यता आहे. त्रेतायुगातच महाभारत घडले होते. याच युगात जगत्कल्याणासाठी भगवान विष्णू श्रीकृष्ण अवतरात प्रकट झाले आणि कालातीत असलेल्या भगवद्गीतेची अमृत वाणी संसाराला प्राप्त झाली. त्याचप्रमाणे अक्षय्य तृतीयेच्या दिवशी हयग्रीव आणि बसवेश्वर यांचा जन्म झाला होता.

अक्षय्य तृतीया २०२३ला शुभ योग संयोग

अक्षय तृतीयेला सर्वार्थ सिद्धी हा योग रात्री ११:२४ ते २३ एप्रिल सकाळी ५:४८ पर्यंत राहील. या शुभ योगात सुरु केलेले कोणतेही शुभ कार्य नक्कीच यशस्वी होते. तीन ग्रहांच्या मिलनाने त्रिपुष्कर योग तयार होतो. अक्षय्य तृतीयेला पहाटे ५.४९ ते ७.४९ पर्यंत हा योग असून, या शुभ योगात कोणतेही शुभ कार्य केल्यास तिप्पट फळ मिळते. अक्षय्य तृतीयेला अमृत सिद्धी हा योग रात्री ११:२४ ते दुसऱ्या दिवशी पहाटे ५.४८ पर्यंत असेल. याच्या नावावरूनच स्पष्ट होते की, हा योग अमृतसारखं फळ देतो आणि शास्त्रात खूप शुभ मानला गेला आहे. अक्षय्य तृतीयेला या शुभ योगात कोणतेही धार्मिक कार्य केल्यास त्याचे फळ अमृतासमान मिळते. अक्षय्य तृतीयेला आयुष्मान योग सकाळी ९ वाजून २६ मिनिटापर्यंत असेल. या दिवशी आयुष्मान योगामध्ये केलेले धार्मिक कार्य जीवनवर्धक मानले जाते. रवी योग हा रात्री ११:२४ ते २३ एप्रिलच्या सकाळी ५:४८ पर्यंत राहील. ग्रहांचा राजा सूर्याची पूर्ण कृपा असल्यामुळे रवी योग हा अत्यंत प्रभावी योग मानला जातो. अक्षय तृतीयेला सौभाग्य योग सकाळी ९.३६ ते रात्रभर चालणार आहे. या योगात केलेल्या विवाहामुळे वैवाहिक जीवन नेहमी आनंदी राहते.

Source link

akshaya tritiyaAkshaya Tritiya 2023akshaya tritiya importance in marathiअक्षय्य तृतीयाअक्षय्य तृतीया 2023अक्षय्य तृतीया महत्व
Comments (0)
Add Comment