बालकांच्या मोफत आणि सक्तीच्या शिक्षण अधिनियमांतर्गत सुरू असलेली प्रवेशप्रक्रिया तांत्रिक अडचणींमध्ये अडकली आहे. यामुळे पालकांना प्रवेश निश्चित करण्यात येत असलेल्या समस्या लक्षात घेऊन, प्रवेशासाठी मुदतवाढ दिली जाणार आहे. अद्याप याबाबतचे निर्णय जाहीर करण्यात आलेला नसला, तरी शिक्षण संचालनालयामार्फत प्रवेशासाठी पुरेसा कालावधी दिला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
फेब्रुवारी महिन्यापासून शाळांची नोंदणी, विद्यार्थी अर्ज प्रक्रिया, लॉटरी प्रक्रिया आणि प्रवेश निश्चिती अशी टप्प्याटप्प्याने ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. विद्यार्थी अर्ज प्रक्रियेदरम्यानही ‘आरटीई’ पोर्टलला तांत्रिक समस्या उद्भवल्याने पालकांसाठी पर्यायी लिंकद्वारे अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. लॉटरी प्रक्रियेनंतर आता प्रवेश निश्चितीदरम्यानही अचानकपणे पोर्टल बंद झाल्यामुळे पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.
निवडपत्र पोर्टलवरून डाऊनलोड करून, प्रवेश पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून घ्यावी लागणार आहे. परंतु, पोर्टल कार्यान्वित नसल्यामुळे गेल्या आठवड्यापासून पालकांना ही प्रक्रियाच करता आलेली नाही. यावर पर्याय म्हणून एका लिंकद्वारे पर्यायी व्यवस्था करण्यात आली असली, तरी त्यावरूनही अत्यंत संथ गतीने काम होत आहे. अशा परिस्थितीत दिलेल्या मुदतीमध्ये निवड यादीतील पालकांना प्रवेश निश्चित करता येणार नसल्याने, पालकांना प्रवेशासाठी पुरेसा कालावधी देण्याचा निर्णय शिक्षण संचालनालयाने जाहीर केला आहे.
‘आरटीई’ प्रवेशासाठी निवड यादी जाहीर केल्यानंतर १२ एप्रिल रोजी या यादीतील विद्यार्थ्यांच्या पालकांना ‘एसएमएस’द्वारे सूचित करण्यात आले होते. १३ ते २५ एप्रिलदरम्यान प्रवेश पडताळणी समितीकडून कागदपत्रांची पडताळणी करून प्रवेश निश्चित करण्याची सूचना या विद्यार्थ्यांच्या पालकांना देण्यात आली होती. परंतु, तांत्रिक अडचणींमुळे राज्यातील प्रवेश निश्चितीची गती अत्यंत संथ असल्याने प्रवेश निश्चितीसाठी पालकांना २५ एप्रिलनंतरही मुदतवाढ दिली जाणार आहे. त्यानंतर उर्वरित जागांवरील प्रवेशासाठी प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना संधी दिली जाणार आहे.
‘एनआयसी’च्या सर्व्हरमुळे समस्या
‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेदरम्यान येत असलेली ही तांत्रिक समस्या नॅशनल इन्फॉर्मेटिक्स सेंटरच्या (एनआयसी) सर्व्हर शिफ्टिंग प्रक्रियेमुळे येत असल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली. यामुळे आधार अपडेशनच्या प्रक्रियेतही अडथळे येत आहेत. आरटीई व आधार अपडेटची संपूर्ण तांत्रिक प्रक्रिया ‘एनआयसी’च्या माध्यमातून होत आहे. त्यामुळे ही तांत्रिक समस्या दूर झाल्याशिवाय ‘आरटीई’ प्रवेश प्रक्रियेतील अडथळे दूर होणे अवघड आहे. यावर तातडीने उपाययोजना गरजेचे असल्याचे या क्षेत्रातील तज्ज्ञांनी सांगितले.