‘विद्यार्थी-पालकांमध्ये शाळा सुरू होण्याच्या तारखांविषयी संभ्रम राहू नये; तसेच त्यांना सुट्यांचे नियोजन करता येण्यासाठी राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू होतील. उन्हाची तीव्रता लक्षात घेता विदर्भातील शाळा ३० जून रोजी सुरू होणार आहेत,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली आहे. इयत्ता बारावीच्या परीक्षा पुढील वर्षी होणार नाहीत, यात तथ्य नाही. पालक आणि विद्यार्थ्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये, असे केसरकर यांनी स्पष्ट केले.
शालेय शिक्षण विभागांतर्गत घेण्यात आलेल्या विविध निर्णयांबाबत केसरकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. केसरकर म्हणाले, की शाळेत दाखलपात्र बालकांसाठी शाळापूर्व तयारी अभियानांतर्गत यावर्षी देखील मुलाच्या शाळेतील पहिल्या पावलाचे स्वागत केले जाणार आहे. शाळापूर्व तयारीचा पहिला मेळावा २६ एप्रिलपासून शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, दुसरा मेळावा जून महिन्यात घेतला जाणार आहे.
यावर्षीपासून सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना गणवेश तसेच वह्या, बूट आणि मोजे हे सरकारतर्फे दिले जाणार आहेत. पुस्तकांमध्ये प्रत्येक धड्यानंतर टिपण (नोटस्) काढण्यासाठी आता एक पान कोरे ठेवले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी होईल, असा विश्वास केसरकर यांनी व्यक्त केला.
इयत्तांचा निकाल ३० एप्रिलपर्यंत
राज्यातील माध्यमिक शाळांना यंदा दोन मेपासून उन्हाळी सुट्टी जाहीर करण्यात आली असून, पुढील २०२३-२४ शैक्षणिक वर्षातील शाळा १२ जूनपासून सुरू होणार असल्याचे सांगण्यात आले होते. इयत्ता पहिली ते नववीचा; तसेच माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक कृष्णकुमार पाटील यांनी अकरावीचा निकाल ३० एप्रिलपूर्वी प्रसिद्ध करण्याचे आदेश दिले.
इयत्ता पहिली ते नववी व इयत्ता अकरावीचा निकाल ३० एप्रिल रोजी अथवा त्यानंतर सुट्टीचा कालावधीत लावता येईल. तो निकाल विद्यार्थी, पालकांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी संबंधित शाळेची राहील.
शाळांतून उन्हाळ्याची व दिवाळीची दीर्घ सुट्टी कमी करून त्याऐवजी गणेशोत्सव, नाताळ यासारख्या सणांचे प्रसंगी समायोजनाने संबंधित जिल्ह्याच्या शिक्षण अधिकाऱ्यांच्या परवानगीने घेण्याबाबत निर्देश देण्यात आले. एकूण सुट्ट्या ७६ दिवसांपेक्षा अधिक होणार नाहीत, याची दक्षता घेण्याबाबतही स्पष्ट करण्यात आले.