नाशिक विभागातील नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांमधील अनधिकृत शाळांची माहिती आठ दिवसांत सादर करण्याचा आदेश शिक्षण उपसंचालक कार्यालयामार्फत संबंधितांना देण्यात आला आहे. जिल्ह्यात अद्याप १७ अनधिकृत शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली असून, आता विभागातील अनधिकृत शाळांची माहितीही घेतली जाणार आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यात २७ अनधिकृत शाळा असल्याचे समोर आले होते. त्यानंतर यंदा मागितलेल्या अहवालानुसार त्यातील १० शाळा बंद झाल्याचे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामार्फत जाहीर करण्यात आले होते. उर्वरित १७ अनधिकृत शाळा बंद करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याची सूचना उपसंचालक कार्यालयामार्फत जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांना, तसेच गटशिक्षणाधिकाऱ्यांना करण्यात आली आहे.
त्याचसोबत विभागात सुरू असलेल्या अनधिकृत शाळांच्या नावांची यादी तातडीने जाहीर करण्याचा आदेश शिक्षण उपसंचालक डॉ. भाऊसाहेब चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना दिला आहे. शिक्षणाधिकारी कार्यालयाला या शाळांची यादी जाहीर करून, त्यामध्ये प्रवेश न घेण्याबाबत पालकांना आवाहन करावे लागणार आहे. त्याचसोबत संबंधित शाळांच्या कागदपत्रांची पडताळणी करून, त्या अनधिकृत असल्यास त्यांना योग्य त्या कारवाईबाबत तातडीने नोटीसही द्यावी लागणार आहे.
गेल्या काही वर्षांत राज्यभरात अनधिकृत शाळांचे पेव फुटले आहे. पालकांना याबाबत फारशी माहिती नसल्यामुळे अनेकदा शाळांमार्फत त्यांची फसवणूक केली जाते. दोन वर्षांपूर्वी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षणादरम्यान नाशिकच्या वडाळा परिसरातील शाळेची केवळ कागदोपत्री नोंद असल्याचे व प्रत्यक्षात शाळाच नसल्याचे निदर्शनास आले होते. त्यानंतर राज्यभरात केलेल्या तपासणीमध्ये जवळपास साडेसहाशे शाळा अनधिकृत असल्याची माहिती पुढे आली होती. त्यानंतर अनेक अनधिकृत शाळा बंद झालेल्या असल्या, तरी अद्याप काही शाळा सुरू आहेत.