हायलाइट्स:
- राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची आढावा बैठक सुरू असतानाच प्रशासकीय इमारतीत लाचखोरी
- लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडलं
- दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
सांगली : जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांची आढावा बैठक सुरू असतानाच प्रशासकीय इमारतीच्या लेखा परीक्षण विभागात लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने छापा टाकून दोन लाचखोर कर्मचाऱ्यांना रंगेहाथ पकडलं आहे. तक्रारदारांच्या वेतनश्रेणी पडताळणी कागदपत्रांना मंजुरी देण्यासाठी लेखाधिकारी व कनिष्ठ लिपिक यांनी पाच हजारांची लाच स्वीकारली.
ही कारवाई सोमवारी दुपारी करण्यात आली आहे. वर्ग २ चे लेखा अधिकारी बाबासो महादेव जाधव (वय ३८) आणि वर्ग ३ चे कनिष्ठ लेखा परीक्षक बबन रामचंद्र कोळी (वय ५७) अशी अटकेतील लाखोरांची नावे आहेत. या दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदारांची निवडश्रेणी पडताळणी आणि त्यांच्या सहकारी मित्रांची वरिष्ठ वेतनश्रेणी पडताळणी करायची होती. यासाठीचे अर्ज त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीत असलेल्या लेखाधिकारी कार्यालयात जमा केले होते. या कार्यालयातील लेखाधिकारी जाधव व कनिष्ठ लिपीक कोळी यांनी त्यांच्याकडे निवडश्रेणी व वेतनश्रेणीचे काम पूर्ण करण्यासाठी पाच हजार रुपये लाचेची मागणी केली. तक्रारदाराने पैसे दिले नसल्याने लेखा परीक्षण विभागाने हे काम अडवून ठेवले होते. याबाबत तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे ५ ऑगस्ट रोजी तक्रार केली होती.
लाच लुचपतच्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केल्यानंतर लेखाधिकारी बाबासो जाधव व कनिष्ठ लिपिक बबन कोळी यांनी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. यानुसार सोमवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयातील प्रशासकीय इमारतीबाहेर सापळा लावला होता. यावेळी तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच घेताना जाधव व कनिष्ठ लिपिक कोळी यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
जिल्हाधिकारी कार्यालयात कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांची आढावा बैठक सुरू असतानाच लेखापरीक्षण विभागातील अधिकाऱ्यांना लाच घेताना रंगेहात पकडल्याने खळबळ उडाली होती.
या प्रकरणी दोघांवर विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, संजय कलगुटगी, अविनाश सागर, सलीम मकानदार, श्रीपती देशपांडे, संजय संकपाळ, भास्कर भोरे, प्रीतम चौगुले, सीमा माने, वीना जाधव, राधिका माने आणि बाळासाहेब पवार यांनी केली.