राज्यात वाढते तापमान लक्षात घेता राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना २१ एप्रिलपासून सुट्टी देण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरुवारी मुंबईत पत्रकार परिषदेत जाहीर केला. त्याचबरोबर विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जून रोजी; तर विदर्भात ३० जूनला शाळा सुरू होतील, असेही त्यांनी या वेळी जाहीर केले.
या वेळी ते म्हणाले, ‘राज्यात सध्या उन्हाची तीव्रता वाढत चालली आहे. येत्या चार ते पाच दिवसांत ही तीव्रता अधिक वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. खारघर येथेही महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळी १५ जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार सावधगिरीने पावले टाकत आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या सर्व शाळांना ही परिस्थिती लक्षात घेता २१ एप्रिलपासून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.’
अखेर संभ्रम दूर
महापालिका शिक्षण विभागाने महापालिका क्षेत्रातील शाळा १२ जूनपासून सुरू होणार असल्याचे परिपत्रक जाहीर केल्यामुळे, शाळा नेमक्या कधी सुरू होणार याबाबत संभ्रमाचे वातावरण होते. परंतु, शिक्षण संचालनालयामार्फत शाळा राज्यातील सर्व शाळा १५ जूनपासून सुरू करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे अखेर हा संभ्रम दूर झाला आहे.
महापालिका प्रशासनाधिकारी सुनीता धनगर यांनी काही दिवसांपूर्वी एक परिपत्रक जाहीर केले होते. नवीन शैक्षणिक वर्षातील शाळा १२ एप्रिलपासून सुरू होणार असल्याचे यामध्ये जाहीर करण्यात आले आहे. शिक्षण संचालनालयाच्या सूचनेप्रमाणे उन्हाळी सुटीचा कालावधी ३४ दिवसांचा असणार आहे असून, शिक्षण विभागाच्या आदेशानुसार २ मे पासून शाळांना सुटी जाहीर करावी लागणार असल्याचे त्यात नमूद करण्यात आले होते.
२ मेपासून सुट्या दिल्यास ३४ दिवसांचा कालावधी ११ जूनला पूर्ण होत असून, महापालिका क्षेत्रातील पहिली ते बारावीच्या शाळा १२ जूनला सुरू करण्यात येणार असल्याचे या परिपत्रकात जाहीर करण्यात आले होते. परंतु, २० एप्रिलला शिक्षण संचालनालयाचे नवीन परिपत्रक जाहीर झाले आहे. यामध्ये प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळा १५ जूनला सुरू करण्याचा आदेश राज्यभरातील शाळांना देण्यात आला आहे.