मुंबई विद्यापीठाचा नवा गोंधळ समोर आला आहे. विद्यापीठाने नुकत्याच जाहीर केलेल्या तृतीय वर्ष बीएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षेत विद्यार्थ्यांना शून्य गुण दिल्याचा प्रकार घडला आहे. याबाबत सुमारे २१६ विद्यार्थ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार केली आहे.
बीएमएस तृतीय वर्ष परीक्षा गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये पार पडली होती. परीक्षेला जवळपास साडेतीन महिने उलटून गेल्यानंतर विद्यापीठाने त्याचा निकाल जाहीर केला. मात्र या विलंबाने लागलेल्या निकालातही विद्यापीठाने गोंधळ घातला आहे. विद्यापीठाने कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड पब्लिक रिलेशन या विषयात विद्यार्थ्यांना शून्य गुण दिले आहेत. तर काही विद्यार्थ्यांना आरआर (रिझल्ट रिझर्व्ह) आणि शून्य गुण असे दोन्ही शेरे देण्यात आले आहेत.
मात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, त्यांना अन्य विषयांमध्ये चांगले गुण असतानाही केवळ एका विषयात शून्य गुण कसे असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. याबाबत कॉलेज आणि विद्यार्थ्यांनी विद्यापीठाला पत्र लिहून निकालात दुरुस्ती करण्याची मागणी केली आहे. तसेच विद्यार्थ्यांच्या परीक्षेची हजेरीही विद्यापीठाला धाडली आहे. विद्यापीठाच्या या गोंधळामुळे विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.
दरम्यान, २१६ विद्यार्थ्यांच्या बाबतीत हा प्रकार घडल्याचा आरोप मुंबई विद्यापीठाचे माजी सिनेट सदस्य राजन कोळंबेकर यांनी केला आहे. ‘पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नसल्याने या चुका घडत आहेत. त्यातून विद्यार्थी वेठीस धरले जात आहेत. विद्यापीठाने तत्काळ पूर्णवेळ परीक्षा नियंत्रक नेमावेत. तसेच या चुका टाळण्यासाठी प्रभावी यंत्रणा राबवावी’, अशी मागणी युवा सेनेचे प्रदीप सावंत यांनी केली आहे.
‘तृतीय वर्ष बीएमएस अभ्यासक्रमाच्या सत्र ५च्या २३६ विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. आसन क्रमांक चुकीचे नमूद केलेल्या अथवा बारकोड चुकीचे नमूद केलेल्या विद्यार्थ्यांचे निकाल राखीव ठेवले आहेत. या विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका शोधली जाईल. त्यांनतर त्यांचा निकाल जाहीर केला जाईल. या विद्यार्थ्यांना तांत्रिक चुकीने शून्य गुण आले आहेत. ते दुरुस्त करून सुधारित निकाल जाहीर केला जाईल’, असे विद्यापीठ प्रशासनाने जाहीर केले आहे.