राज्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचा पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार (एनईपी) लागू केला जाणार आहे. या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राबवायच्या कालबद्ध कृती कार्यक्रमाचे वेळापत्रक जारी करण्यात आले. त्यानुसार राज्यातील विद्यापीठे आणि स्वायत्त महाविद्यालयांना ३० एप्रिलपर्यंत एनईपी अंमलबजावणी कक्षाची स्थापन करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले.
राज्यात आगामी वर्षापासून एनईपीची अंमलबजावणी केली जाणार आहे. त्याबाबत सुकाणू समितीने काही दिवसांपूर्वी राज्य सरकारला अहवाल सादर केला होता. सुकाणू समितीच्या शिफारशींनुसार अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखड्याबाबत सुधारित मार्गदर्शक सूचना राज्य सरकारने जारी केल्या आहेत.
उच्च शिक्षण विभागाकडून यंदा पदवीच्या बीए, बीएससी आणि बीकॉम, तर पदव्युत्तर पदवीच्या एमए, एमएसी आणि एम.कॉम अभ्यासक्रम राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार राबविण्याचे निश्चित केले. तसेच एआयसीटीईकडून मान्यता दिली जात नाही, अशा पदवी आणि पदव्युत्तर पदवीच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंमलबजावणी येत्या वर्षापासून ‘एनईपी’नुसार केली जाणार आहे.
मात्र ‘एआयसीटीई’, ‘पीसीआय’, ‘बीसीआय’, ‘सीओए’, एनसीटीई यांसारख्या संस्थांनी त्यांच्यामार्फत मान्यता दिल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांचा अभ्यासक्रम आराखडा अद्याप जाहीर केला नाही. त्यामुळे या अभ्यासक्रमांची यंदापासून एनईपीनुसार अंमलबजावणी शक्य नसल्याची चिन्हे आहेत.
कालबद्ध कार्यक्रम
राज्य सरकारने एनईपीची अंमलबजवाणी करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखून दिला आहे. राज्यातील प्र-कुलगुरू असलेली विद्यापीठे आणि प्राचार्य असलेल्या स्वायत्त महाविद्यालयांना ३० एप्रिलपर्यंत एनईपीची अंमलबजावणी करणाऱ्या कक्षाची स्थापना करावी लागेल. त्यानंतर विद्यापीठांना शैक्षणिक परिषदेची आपत्कालीन विशेष बैठक बोलावून राज्य सरकारांचे निर्देश ३० एप्रिलपर्यंत स्वीकारावे लागणार आहेत.
विद्याशाखानिहाय सर्व सहा प्रकारांसाठी विषयांची यादी तयार करावी लागेल. ही यादी ३१ मेपर्यंत तयार करण्याची सूचना देण्यात आली आहे. तसेच या नवीन अभ्यासक्रम आराखड्याबाबत जनजागृती करण्याची सूचना विद्यापीठांना करण्यात आली.