सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामार्फत विद्यापीठाशी संलग्न शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयांच्या तपासणीची घोषणा करण्यात आली होती. परंतु, तज्ज्ञांच्या उपलब्धतेअभावी ही तपासणी रखडल्याची माहिती पुढे आली आहे. महाविद्यालयांकडून महिती मागविल्यानंतर या तपासणीबाबत पुढे कोणतीही हलचाल विद्यापीठामार्फत करण्यात आलेली नाही.
राज्यातील अनेक शिक्षणशास्त्र महाविद्यालये सुविधांपासून वंचित असून, बहुतांश महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकनही केलेले नाही. सातत्याने सूचना देऊनही नॅकबाबत ही महाविद्यालये उदासीन असल्यामुळे शिक्षण संचालनालयाच्या सूचनेनुसार शिक्षणशास्त्र महाविद्यालयांचे ‘अॅकॅडमिक अँड अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ऑडिट’ करण्याची मोहीम विद्यापीठामार्फत आखण्यात आली होती. विद्यापीठाशी संलग्न नाशिक, पुणे तसेच अहमदनगर जिल्ह्यातील संलग्न महाविद्यालयांमार्फत ऑनलाइन फॉर्मच्या माध्यमातून माहिती भरून घेण्यात आली होती. २० मार्चपर्यंत ही माहिती घेऊन त्यानंतर एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापासून शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयांची तपासणी सुरू केली जाणार होती. परंतु तज्ज्ञांच्या उपलब्धतेअभावी सध्या तरी ही तपासणी रखडल्याची माहिती पुढे आली आहे.
महाविद्यालयेही अनभिज्ञ
पुणे विद्यापीठासोबत राज्यातील अन्य विद्यापीठांमधील संबंधित महाविद्यालयांची तपासणी करण्याची सूचना उच्च शिक्षण संचालनालयामार्फत देण्यात आली होती. राज्यभरातील विविध महाविद्यालयांमध्ये सध्या प्रात्यक्षिक परीक्षा सुरू असल्यामुळे, या तपासणीसाठी आवश्यक असणारे तज्ज्ञच सद्यस्थितीत राज्यभरात पुरेशा प्रमाणात उपलब्ध नसल्याची माहिती शिक्षण विभागातील सूत्रांनी दिली.
तसेच याबाबत विद्यापीठामार्फत अधिकृतपणे कोणतीही सूचना संबंधित महाविद्यालयांनाही देण्यात आलेली नाही. त्यामुळे तपासणी होणार की, नाही याबाबत महाविद्यालयेही अनभिज्ञ आहेत.
राज्य सरकारमार्फत तपासणी?
राज्यातील सर्व शिक्षणशास्त्र व शारीरिक शिक्षणशास्त्र महाविद्यालयांना ‘नॅशनल कौन्सिल फॉर टीचर्स एज्युकेशन’च्या (एनसीटीई) निकषांनुसार महाविद्यालयांचे कामकाज चालविणे बंधनकारक असते. यासाठी पुढील महिन्यात राज्य सरकारमार्फत राज्यातील सर्व महाविद्यालयांची विशेष तपासणी केली जाणार असल्याची चर्चाही शैक्षणिक वर्तुळात सुरू आहे.