RTMNU: परीक्षांना चार महिन्यांचा कालावधी होऊनही निकाल लागेना

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या काही हिवाळी परीक्षांचे निकाल अद्यापही जाहीर न झाल्याने पुन्हा एकदा विद्यापीठाचा ढिसाळ कारभार पुढे आला आहे. परीक्षांना चार महिन्यांचा कालावधी होऊनही अनेक शाखांचे निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांचा रोष वाढू लागला आहे. गुरुवारी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाच्यावतीने विद्यापीठ प्रशासनाविरोधात आंदोलन करण्यात आले.

विद्यापीठाने डिसेंबर महिन्यात बीए, बीकॉम, बीएस्सी, एमकॉम, एमएसह इतर काही शाखांच्या परीक्षा घेतल्या. परीक्षांनंतर काही दिवसांतच निकाल लागणे अपेक्षित आहे. दरम्यान, परीक्षांना आता १२० दिवस उलटूनही या शाखांचा निकाल जाहीर न झाल्याने विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे ओबीसी विद्यार्थी महासंघाच्यावतीने विद्यापीठाच्या ढिसाळ कारभाराच्या विरोधात तीव्र निदर्शने करण्यात आली.

विद्यापीठाने विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्याचे काम एमकेसीएलला दिले होते. मात्र, एमकेसीएलसोबतचा करार रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांची गोळा केलेली माहिती कंपनी विद्यापीठाला द्यायला तयार नाही. विद्यार्थ्यांच्या माहिती अभावी विद्यापीठाला निकाल घोषित करता येत नाही. यावरून विद्यापीठाचा कारभार किती नियोजनशून्य आहे, याबद्दल महासंघाने नाराजी व्यक्त केली.

या प्रकाराचा परिणाम केवळ निकालावरच झाला नसून विद्यापीठाचे वेळापत्रकही बिघडले आहे. त्यामुळे उन्हाळी परीक्षा केव्हा होणार, याबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या सर्व प्रकाराने विद्यापीठाचा दर्जा किती खालावला आहे हेच सिद्ध झाले आहे, अशी टीकाही महासंघाने केली. यावेळी शिष्टमंडळाने प्र-कुलगुरू डॉ. संजय दुधे यांना निवेदन देत यावर तत्काळ तोडगा काढण्याची विनंती केली. त्याचबरोबर यावर तोडगा न निघाल्यास आंदोलन अधिक तीव्र करून बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे.

महासंघाचे शहराध्यक्ष विनोद हजारे आणि जिल्हाध्यक्ष नीलेश कोढे यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या या आंदोलनात विद्यार्थी महासंघाचे पूर्व नागपूर अध्यक्ष रूपेश कडाऊ, रूपम झाडे, राहुल निमजे, निखील धुर्वे, विभोर बेलेकर, वैभव मांडवे, हर्षित मौर्य, गजानन शाहू, शिवानी विश्वकर्मा, गीता विश्वकर्मा, इशा चौधरी, सेजल शेंडे, खुशी दुरुगकर, वैष्णवी कोरडे, मनस्वी सहारे, हिताक्षी इंगेवार, शोभा सोनसार्वा, पल्लवी केरेकर, रूपेश राऊत आदींसह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले होते.

Source link

Career Newseducation newsMaharashtra TimesNagpur UniversityNagpur University ExaminationsRashtrasant Tukdoji Maharajपरीक्षांना चार महिन्यांचा कालावधी
Comments (0)
Add Comment