बालकांच्या मोफत शिक्षणासाठी प्रवेश प्रक्रियेची सोडत जाहीर झाली असून पालघर जिल्ह्यातील तीन हजार ८७ विद्यार्थ्यांची प्राथमिक फेरीत निवड झाली आहे. जिल्ह्यातील २६६ शाळांसाठी पाच हजार ४८३ रिक्त जागा निश्चित करण्यात आल्या होत्या. त्यासाठी चार हजार ६३३ ऑनलाइन अर्ज प्राप्त झाले होते. यामधून निवड झालेल्या पालकांना त्यांच्या निवडीचे एसएमएन व शाळांचे नाव कळवण्यात येणार आहे.
जे विद्यार्थी प्रतीक्षा यादीत असतील, अशा विद्यार्थ्यांना एसएमएस पाठवले जाणार आहेत. निवड झालेल्या विद्यार्थ्यांची पडताळणी व प्रवेश प्रकिया १३ एप्रिलपासून सुरू झाली असून ती २५ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे.
बालकांच्या मोफत शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ नुसार समाजातील वंचित व आर्थिक दुर्बल घटकातील बालकांना नामांकित इंग्रजी शाळांमध्ये २५ टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आहे. सन २०१२-१३ पासून राज्यातील लाखो बालकांना नर्सरी किंवा इयत्ता पहिलीच्या वर्गापासून इंग्रजी शाळांमध्ये मोफत प्रवेश दिला जात आहे. अत्यंत महत्त्वाच्या अशा या योजनेत सन २०२३-२४साठी राज्यभरातून लाखो पालकांनी आपले ऑनलाइन प्रवेश नोंदवले होते.
प्रधान सचिव, शालेय शिक्षण व क्रीडा मंत्रालय, आयुक्त शिक्षण पुणे, शिक्षण संचालक (प्राथमिक) यांनी ५ एप्रिलला शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत २५ टक्के प्रवेशासाठी सोडत काढली होती. त्यानंतर, १२ एप्रिल रोजी सन२०२३-२४साठी विद्यार्थ्यांची निवड केल्याचे जाहीर केले होते. ही निवड प्रक्रिया पार पडली असून ‘सरल’ प्रणालीच्या विद्यार्थी पोर्टलवर निवड यादी प्रकाशित करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्यातील आठ हजार ८२३ शाळांमध्ये एक लाख एक हजार ८४६ एवढ्या रिक्त जागा जाहीर करण्यात आल्या होत्या. त्यासाठी संपूर्ण राज्यात तीन लाख ६४ हजार ४१३ एवढे ऑनलाइन अर्ज आले होते. यापैकी ९४ हजार ७०० विद्यार्थ्यांची रिक्त जागांवर निवड करण्यात आली असून ८१ हजार १२९ विद्यार्थ्यांना प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आलेले आहे.
तात्काळ प्रवेश घेण्याचे आवाहन
सर्व पालकांनी आपले प्रवेश अर्ज, अलॉटमेंट अर्ज आणि सर्व दस्तावेज पडताळणी समितीकडून तपासून घ्यावे व आपला प्रवेश तात्काळ करून घ्यावा, असे आवाहन पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम, मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे, उपाध्यक्ष व शिक्षण समिती सभापती पंकज कोरे यांच्यामार्फत करण्यात आले आहे.