राज्यात काही दिवसांपासून तापमानात वाढ झाली आहे. सर्वत्र उष्णतेची लाट पसरली असन प्रतिबंधात्मक उपाय म्हणून शाळेय शिक्षण विभागाने शुक्रवारपासून राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुट्टी जाहीर केली आहे. विदर्भ वगळता राज्यातील शाळा १५ जून रोजी सुरू होतील. या कालावधीत शिक्षकांना मात्र सुट्टी नसेल. निकालपत्रक तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात असून एक मेपूर्वी निकाल तयार करण्यासाठी शिक्षकांना वेळ मिळणार आहे.
शालेय विभागाने यासंदर्भात २० एप्रिल रोजी परिपत्रक काढले आहे. विदर्भात ३० जून रोजी शाळा सुरू होतील. गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर शालेय शिक्षण विभागाने तातडीने हा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे.
जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या २००० च्या घरात शाळा आहेत. प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांची संख्या साडेनऊ हजारांवर आहे. सर्व शाळांमध्ये गेल्या आठवड्यातच द्वितीय सत्र परीक्षा घेण्यात आल्या. त्यापूर्वी पंधरा दिवसांपासून उन्हामुळे शाळा सकाळच्या सत्रात सुरु होत्या. सकाळी साडेसात ते बारा या वेळेत शाळा सुरु होत्या. मात्र उन्हामुळे ऐन बाराच्या सुमारास शाळा सुटत असल्याने विद्यार्थ्यांना उन्हाचा त्रास होत होता.
शिवाय परीक्षा संपल्यानंतर शाळेत विद्यार्थ्यांची उपस्थिती ५० टक्क्यांवर आली होती. त्यामुळे शुक्रवारपासून सुट्टी जाहीर केल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
खाजगी शाळा सुरूच ?
यंदा बहुतांश शाळांचे शैक्षणिक सत्र लवकर संपवून पुढील वर्षीचे वर्ग एप्रिल महिन्यात सुरु करण्यात आले. आता शालेय शिक्षण विभागाने सुट्टी जाहीर केली. शनिवारी रमजान ईदची सुट्टी आहे. रविवारची सुट्टी. त्यानंतर सोमवारपासून शाळा सुरू राहणार की सुट्टी याबाबत मात्र काही खाजगी शाळांमधून अजून काही जाहीर केले नसल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे या शाळा एप्रिल अखेरपर्यंत सुरू राहणार की, सोमवारपासून सुट्टी जाहीर करणार याबाबत संभ्रम आहे.