हॉटेल, उपहारगृहे सातही दिवस रात्री १० पर्यंत खुले ठेवण्याच्या परवानगीसाठी शासनाकडे प्रस्ताव

हायलाइट्स:

  • निर्बंधांमध्ये आणखी शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न
  • व्यवसायांना आठवड्याचे सातही दिवस रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव
  • अमरावतीच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची माहिती

अमरावती : ‘कोविडबाधितांची संख्या कमी झाल्याने निर्बंधांमध्ये शिथिलता आणण्यासाठी प्रयत्न होत आहेत. जनजीवन पूर्वपदावर येऊन उद्योग, व्यवसायांना चालना मिळावी यासाठी शासन सकारात्मक आहे. त्यानुसार उपाहारगृहे, हॉटेल, बार, खानावळी आदी व्यवसायांनाही आठवड्याचे सातही दिवस रात्री १० वाजेपर्यंत खुले ठेवण्याची परवानगी मिळावी यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे,’ अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सोमवारी दिली आहे.

कोविडबाधितांची संख्या घटल्याच्या पार्श्वभूमीवर संचारबंदीत काही शिथिलता आणून दुकाने, आस्थापना सोमवार ते शुक्रवार रात्री ८ पर्यंत खुले ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, हॉटेल, उपाहारगृहे, खानावळींना सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ पर्यंत एकूण ५० टक्के आसन क्षमतेसह व दुपारी ४ ते रात्री ८ पर्यंत घरपोच सेवा पुरविण्याचे संचारबंदी आदेशात नमूद आहे. तथापि, मर्यादित वेळेमुळे हॉटेल, बार, उपाहारगृहाच्या व्यवसायांवर मोठा परिणाम होत आहे. गत दीड वर्षांपासून सातत्याने अडथळे आहेत.

task force meeting: मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्सची बैठक संपली; निर्बंधांत आणखी शिथिलता मिळणार का?

या पार्श्वभूमीवर, तसेच रुग्णसंख्या कमी झालेली असल्याने हॉटेल, बार, उपाहारगृहांनाही रात्री खुले ठेवण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. त्याची दखल घेऊन या व्यवसायांनाही रात्रीपर्यंत खुले ठेवण्यास परवानगीबाबत प्रस्ताव शासनाकडे पाठवावा, असे निर्देश पालकमंत्री ॲड. ठाकूर यांनी जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना दिले. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे.

रुग्णसंख्या घटली

जिल्ह्यातील मागील आठवड्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर हा ०.३२ आणि ऑक्सिजन बेडचा भरणा १.६२ आहे. गेल्या २ महिन्यापासून रुग्णसंख्या कमी होत आहे. दैनंदिन रुग्णसंख्या ५ ते १० इतकीच आढळून येत आहे. जिल्ह्यात परिस्थिती नियंत्रणात आहे. तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज आहे.

उद्योग, व्यवसायांचे नुकसान होऊ नये व जनजीवन पूर्वपदावर यावे यासाठी राज्य शासनाकडून सातत्याने प्रयत्न होत आहेत. कोरोना साथ आटोक्यात आणण्यासाठी गत दीड वर्षांपासून शासनाकडून अनेक पातळ्यांवर प्रयत्न होत आहेत. त्यामुळे कोविडबाधितांची संख्या घटली आहे. लसीकरणालाही वेग देण्यात आला आहे. अनेक सेवा पूर्ववत सुरू होत आहेत. त्यानुसार हॉटेल, उपाहारगृहांनाही मुभा देण्यासाठी हा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे व लवकरच त्याबाबत सकारात्मक निर्णय होईल, असं पालकमंत्र्यांनी सांगितलं आहे.

‘जनजीवन पूर्वपदावर येत असताना कोरोनाची तिसरी लाट येऊ नये यासाठी सर्वांनी सजग राहणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्वांनी ‘कोविड ॲप्रोप्रिएट बिहेव्हिअर’चे पालन काटेकोरपणे करावे. कारवाईची वेळ येऊ नये. संयम आणि स्वयंशिस्तीतूनच आपण संभाव्य लाट रोखू शकू. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावं,’ असं आवाहनही यशोमती ठाकूर यांनी केले.

Source link

Amravati newsYashomati Thakurअमरावतीकरोना निर्बंधयशोमती ठाकूर
Comments (0)
Add Comment