नव्या शैक्षणिक धोरणात काळानुसार बदल करण्यात आले आहे. त्यामुळे शिक्षकांनी काळानुसार सकारात्मक बदल करण्याची आवश्यकता आहे, असे मत विभागीय शिक्षण उपसंचालक डॉ. वैशाली जामदार यांनी व्यक्त केले.
सर्वोदय आश्रम, नागपूरच्या वतीने शुक्रवारी मामा क्षीरसागर स्मृती आचार्य पुरस्कार आणि दि. ह. सहस्त्रबुद्धे स्मृती शिक्षक प्रबोधनी पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. जामदार बोलत होत्या. कार्यक्रमाला ज्येष्ठ स्वातंत्रसेनानी लीलाताई चितळे, सर्वोदय आश्रमचे सचिव वंदन गडकरी उपस्थित होते.
डॉ. जामदार यांनी पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करत अशा पुरस्कारांमुळे आपल्या कार्याला अधिक गती मिळते असे सांगितले. शिक्षकांचे कार्य केवळ विद्यार्थ्यांना वर्गात शिकवण्यापुरते मर्यादित नसून त्यांच्यावर सामाजिक जबाबदारीही आहे.
या जबाबदारीची जाणीव ठेवून अनेक शिक्षक आपापल्या परिसरामध्ये सेवाकार्य करीत असतात. अशा शिक्षकांचा सर्वांनी आदर्श घ्यावा व नव्या उमेदीने काम करावे असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी सत्काराला उत्तर देताना शिक्षक खुशाल कापसे यांनी त्यांच्या शाळेमध्ये सुरू असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
आज महापुरुषांना विविध जाती धर्मांमध्ये वाटले जात असताना विद्यार्थ्यांना संविधानिक मूल्ये शिकवण्याची गरज आहे. यासाठी ‘जागर संविधानाचा’ हा कार्यक्रम सुरू केला आहे. यातून विद्यार्थ्यांना संविधानाचे धडे दिले जाते. दमयंती पांढरीपांडे यांनी परीक्षकांच्या वतीने मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संदेश सिंगलकर यांनी केले. आभार वंदन गडकरी यांनी मानले.
पुरस्काराचे मानकरी
मामा क्षीरसागर स्मृती आचार्य पुरस्काराने गडचिरोली जिल्ह्यातील वाळवी गावातील शिक्षक श्रीकांत काटेलवार व पारशिवनी येथील आदर्श शिक्षक खुशाल कापसे यांचा गौरव करण्यात आला. दि. ह. सहस्त्रबुद्धे स्मृती शिक्षक प्रबोधनी पुरस्काराने सेवानिवृत्त शिक्षक मधुकर धंदरे यांचा सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.