हायलाइट्स:
- नगरसेवकांची गटारी थेट पालिका ऑफिसमध्ये,
- टेबलवर फाईल्सच्या जागी होत्या दारुच्या बाटल्या आणि….
- दारू, बिर्याणी खातानाचा व्हिडिओ व्हायरल
परभणी : गंगाखेड नगरपालिका सभागृहात रविवारी गटारी निमित्त बिर्याणी पार्टी साजरी केल्याचा एक व्हिडिओ सध्या जोरदार वायरल होत आहे. गटारी साजरी करण्यासाठी नगरपालिका कर्मचाऱ्यांनी आणि काही हौसी नगरसेवकांनी नगरपालिकेच्या सभागृहाची निवड केली आणि बिर्याणी पार्टी केली.
फक्त बिर्याणी पार्टीच नाहीतर त्याआधी अध्यक्ष आणि उपाध्यक्षच्या केबिनमध्ये मद्यपान देखील केल्याची चर्चा आहे. व्हायरल व्हिडीओनंतर आता या घटनेचा सर्वत्र निषेध होत असून काँग्रेस, शिवसेना, मनसेकडून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शिवसेनेने तर नगरपालिकेचे मुख्याधिकारी लोमटे यांना निलंबित करण्याची मागणी केली. दरम्यान, वारंवार संपर्क करूनही मुख्याधिकारी कॅमेऱ्यासमोर बोलायला तयार नाहीत. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे नगर परिषद कार्यालयातच गटारी साजरी केल्याचा संतापजनक प्रकार ऊघडकीस आला आहे. स्वतः नगरसेवकच या पार्टीत बिर्याणीवर ताव मारताना दिसत आहेत.
दरम्यान , जेथे पार्टी सुरू होती त्या बाळासाहेब ठाकरे सभागृहात cctv असल्याने सर्व घटना cctv मध्ये कैद झाली. घटनेचा व्हिडिओ सध्या जिल्ह्यात चर्चेचा विषय बनला आहे. काल रविवारी दर्श आमावस्या होती. सोमवारपासून श्रावण महिना सुरू होत असल्याने या आमावस्येला गटारी आमावस्या म्हणुनही ओळखले जाते.
दरम्यान, या झाल्या प्रकाराबाबत शहरासह जिल्ह्यात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणात सहभागी नगरसेवक आणि पार्टी करण्यास परवानगी देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर नगराध्यक्ष, मुख्याधिकारी काय कारवाई करतात ? याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.