RTMNU: विद्यापीठाचे अ‍ॅकेडमिक कॅलेंडर घोषित करा, सिनेट सदस्यांची मागणी

म. टा. प्रतिनिधी, नागपूर

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने अॅकेडमिक कॅलेंडर घोषित करावे, अशा मागणीचे निवेदन राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद आणि सिनेट सदस्यांनी कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना दिले.

विद्यापीठाद्वारे अजूनही हिवाळी २०२२च्या परीक्षा घेण्यात येत आहे. त्याचप्रमाणे ज्या परीक्षा झाल्या आहेत त्यापैकी अनेक परीक्षांचे निकाल अजूनपर्यंत लागलेले नाहीत. ४५ दिवसांच्या आत परीक्षाचे निकाल घोषित झाले पाहीजे, असा कायदा असताना विद्यापीठात मात्र तसे होताना दिसत नाही.

अशात ज्या कारणांमुळे परीक्षा घेण्यासाठी व त्यांचे निकाल लावण्यासाठी इतका उशीर होतो आहे, त्या कारणांचा शोध घेऊन व ज्यांच्यामुळे ही समस्या तयार झाली आहे त्यांच्यावर जबाबदारी नक्की करून तातडीने कार्यवाही करावी. परीक्षा व निकाल यामध्ये जो घोळ झाला आहे त्या बाबींचा खुलासा व्हावा. विलंब होऊ नये, याकरिता सिनेट सदस्यांची चौकशी समिती तयार करावी.

तसेच येणाऱ्या उन्हाळी २०२३ व हिवाळी २०२३ या परीक्षा वेळेवर होतील व त्यांचे निकाल हे वेळेवर लागतील याकरिता ठोस उपाययोजना करावी, नवीन शैक्षणिक वर्षातील प्रवेश परीक्षा, त्यांचे निकाल इत्यादींबाबतचे अॅकेडमिक कॅलेंडर घोषित करावे, आदी मागण्यांकडे याप्रसंगी लक्ष वेधण्यात आले.

याप्रसंगी राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, सिनेट सदस्य विष्णू चांगदे, मनीष वंजारी, अजय चव्हाण, प्रथमेश फुलेकर, दिनेश शेराम, रोशनी खेलकर, वामन तुर्के, सुनील फुडके, किशोर इंगळे, विजय इलोरेकर, राज मदनकर, कुमुद रंजन, कविता लोया, शुभांगी नक्षिने, नीरज जावडे यांची उपस्थिती होती.

परीक्षा फॉर्मचाही घोळ

अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी परीक्षा फॉर्म निघालेले नाहीत. नियमित विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म परीक्षेच्या तीन दिवस आधी भरण्यात आले. त्यामुळे विद्यार्थ्यांना वेळेवर रोल नंबरदेखील मिळाले नाहीत. तात्पुरते रोल नंबर देऊन अनेक ठिकाणी परीक्षा घेण्यात आल्याचा मुद्दा कुलगुरुंपुढे मांडण्यात आला.

विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसंदर्भात राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड यांच्या नेतृत्वातील शिष्टमंडळाने कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांना निवेदन दिले.

Source link

Academic CalendarCareer Newseducation newsMaharashtra TimesNagpur UniversityRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universitysenet Demandअॅकेडमिक कॅलेंडरसिनेट सदस्य
Comments (0)
Add Comment