ईदच्या मुहूर्तावर प्रदर्शित झालेल्या सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाची ओपनिंग अपेक्षेपेक्षा खूपच नीरस झाली होती. चित्रपटाच्या कोल्ड ओपनिंगने सलमानचे फॅन्स अस्वस्थ झाले होते. पण त्याच्या कट्टर चाहत्यांनी दुसऱ्या आणि तिसर्या दिवशी सिनेमाला खणखणीत प्रतिसाद देत ‘किसी का भाई किसी की जान’ बॉक्स ऑफिसवर आपटण्यापासून वाचवला.
तिसऱ्या दिवसाचे चित्रपटाचे कलेक्शन
ईद आणि वीकेंडच्या सुट्ट्यांचा चित्रपटाला चांगलाच फायदा झाला आहे. सुरुवातीच्या ट्रेंडनुसार, चित्रपटाने तिसऱ्या दिवशी २५ ते २७ कोटींची कमाई केली आहे. यासह तीन दिवसांत चित्रपटाचे कलेक्शन जवळपापस ६५-६८ कोटी झाले आहे. म्हणजेच ‘किसी का भाई किसी की जान’ने तीन दिवसांत ५० कोटींचा आकडा पार केला आहे.
पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाची चित्रपटाची कमाई
चित्रपटाच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवसाच्या कमाईबद्दल बोलायचे झाले तर, ‘किसी का भाई किसी की जान’ने पहिल्या दिवशी १५.८१ कोटींची कमाई केली. मात्र दुसऱ्या दिवशी चित्रपटगृहांमध्ये सिनेमा पाहण्यासाठी गर्दी झाली. दुसऱ्या दिवशी सिनेमाने २५.७५ कोटींचे कलेक्शन केले आणि आता तिसर्या दिवसाची कमाईही २५-२७ कोटींच्या दरम्यान बोलली जात आहे. ईदच्या वीकेंडला चित्रपटाची कमाई उत्तम होती, पण आता सर्वांच्या नजरा सोमवारच्या कलेक्शनवर लागल्या आहेत. सोमवारी सिनेमाचा बॉक्स ऑफिसवर कसा परिणाम होतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
फरहाद सामजी यांनी ‘किसी का भाई किसी की जान’चे दिग्दर्शन केले आहे. हा एक मल्टीस्टारर कौटुंबिक ड्रामा असलेला सिनेमा आहे. सध्या तरी सिनेमाला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळत आहे. आता सिनेमाचे फायनल कलेक्शन कितपत पोहोचते आणि किती दिवस टिकते हे पाहावे लागेल.
सलमान खानला पाहून चाहते भारावले, ईद दिवशी कडक सुरक्षेत दबंग बाल्कनीत