मुंबई विद्यापीठातील विद्यार्थ्यांची झेरॉक्ससाठी एक किलोमीटरची पायपीट

म. टा. प्रतिनिधी

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा भवन येथील झेरॉक्स सेंटर बंद झाल्याने विद्यार्थ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. झेरॉक्स काढण्यासाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत पायपीट करावी लागत आहे.

मुंबई विद्यापीठाच्या कालिना कॅम्पस येथील महात्मा फुले भवनमधील परीक्षा विभाग हा विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून सुमारे ८०० मीटर ते एक किलोमीटर अंतरावर आहे. मुंबईत विद्यापीठातील विद्यार्थ्यांसह विद्यापीठाच्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील विद्यार्थी आणि शिक्षक विविध कामानिमित्ताने विद्यापीठात येतात. प्रशासकीय कामे पूर्ण करण्यासाठी त्यांना विविध कागदपत्रांच्या प्रती विद्यापीठात जमा कराव्या लागतात.

करोनापूर्वी विद्यापीठातील परीक्षा विभागात झेरॉक्स केंद्र होते. या झेरॉक्स केंद्राचा विद्यार्थ्यांना मोठा आधार होता. त्यातून आवश्यक कागदपत्रांची परीक्षा विभागात पूर्तता करण्यासाठी विद्यार्थ्यांना लागलीच झेरॉक्स काढणे शक्य होते. मात्र गेल्या वर्षभराहून अधिक काळापासून हे केंद्र बंद झाले आहे. परिणामी एक-दोन झेरॉक्स काढण्यासाठीही विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापर्यंत पायपीट करावी लागत आहे.

पंचवीस रुपयांचा भुर्दंड

‘पदवी प्रमाणपत्र काढण्यासाठी विद्यापीठात आलो होतो. त्यावेळी अर्जासोबत जोडण्यासाठी गुणपत्रिकेची झेरॉक्स हवी होती. ही झेरॉक्स मिळविण्यासाठी रिक्षाला २५ रुपये खर्च करून विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावर जावे लागले. तसेच ये-जा करण्यात अर्धा तास वाया गेला. केवळ २ रुपयांच्या एका झेरॉक्सकरीता २५ रुपयांचा खर्च आला. विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाने झेरॉक्सची सुविधा उपलब्ध करून द्यायला हवी’, अशी मागणी विद्यार्थी अक्षय रामकृष्णन याने केली आहे.

‘केंद्र तातडीने सुरू करावे’

महात्मा फुले भवन येथे आधी झेरॉक्स केंद्र होते. आता ते बंद केल्याने विद्यार्थ्यांना छोट्या गोष्टींसाठी बाहेर ये-जा करावी लागते. विद्यार्थ्यांचा त्रास वाचवा याकरीता विद्यापीठाने सवलतीच्या दरातील झेरॉक्स केंद्र तातडीने सुरू करावे, अशी मागणी छात्र भारती विद्यार्थी संघटनेचा महाराष्ट्र अध्यक्ष रोहीत ढाले यांनी केली.

Source link

Career Newseducation newsMaharashtra Timesmumbai universityMumbai University studentMumbai University Xeroxझेरॉक्समुंबई विद्यापीठविद्यार्थ्यांची पायपीट
Comments (0)
Add Comment