जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा गणेशपूर (भंडारा) येथे मागील वर्षी पटसंख्या शून्यावर आली. पटसंख्येच्या नियमात शाळा बंद पडली. आता या शाळेचे रुपडे बदलवित पुनरुज्जीवन करण्यात आल्याने प्रवेश सुरू झाले आहेत. आठवडाभरात ८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला आहे. लवकरच ही संख्या वाढण्याची आशा व्यक्त होत आहे.
जिल्हा परिषदेच्या काही शाळांमधील शिक्षणाची स्थिती ढासळली. अनेक पालकांनी दुसऱ्या शाळांचा पर्याय निवडला. काहींनी इंग्रजी माध्यमाच्या शांळांमध्ये प्रवेश मिळवून दिले. पटसंख्या रोडावल्याने राज्यभरातील अनेक जिल्हा परिषदेच्या शाळा बंद होण्याच्या स्थितीत आहेत. चार-दोन विद्यार्थी उरल्यास त्यांचे दुसऱ्या शाळांमध्ये समायोजन केले जात आहे. भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपुरातील शाळाही बंद पडली. वर्षभरात काही बदल करीत शाळेतील गजबज परत आणण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. याचा परिणाम म्हणून आठवडाभरताच परिणामही दिसून आला आहे.
आतापर्यंत इयत्ता पहिलीत २० विद्यार्थी, दुसरीत १२, तिसरीत १३, चवथीत १०, पाचवीत १२, सहावीत १० तर सातव्या वर्गात सात विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले आहेत. आतापर्यंत एकूण ८४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. १५० विद्यार्थी प्रवेशाचे लक्ष्य शिक्षकांना साध्य करायचे आहे. आता विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतल्याने शाळेच्या खोल्या रंगीबिरंगी होऊ लागल्या आहेत.
एक वर्षांनंतर परत पुन्हा शिक्षक व विद्यार्थ्यांचा संवाद होत आहे. नवीन प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी संस्कार शिबिर सुरू करण्यात आले आहे. ५ मेपर्यंत संस्कार शिबिर चालणार आहे. म्युझिकल योगा, चित्रकला, पेंटींग, जादूचे प्रयोग, ओरिगामी, पक्ष्यांचे व प्राण्यांचे आवाज, मॅजिक बस उपक्रम, मैत्री संगणकाशी, भाषिक खेळ, लाठी-काठी, लाइव्ह बालगीते, बडबडगीते, क्राफ्ट, आजी-आजोबांच्या गोष्टी, मनोरंजक खेळ, बोलके व्यासपीठ, मैत्री करुया गणिताशी, वैदिक गणित आदी बाबी शिबिरात घेण्यात येणार आहे.
फिनलँड शिक्षण पद्धतीवर भर
गणेशपूरच्या जिल्हा परिषद डिजिटल स्कूलमध्ये भविष्यवेधी शिक्षण, रोबोटिक शिक्षण, संपूर्ण वर्ग सेमी इंग्रजी, डिजिटल क्लासरूम, फिनलँड शिक्षण पद्धतीवर आधारित शिक्षण देण्याचे निश्चित करण्यात आले आहे. पालकांनी पाल्याचे मोफत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन शाळा प्रशासनाने केले आहे.