गायकवाड पाटील सीबीएसई शाळा बंद झाल्याने अडचणीत आलेल्या आणि आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे समायोजन करण्यात आले आहे. अशा २१ विद्यार्थ्यांना इतर शाळांमध्ये समायोजित करण्यात आले आहे.
नागपूर पंचायत समितीअंतर्गत येणाऱ्या डोंगरगाव केंद्रातील धुटी या गावातील गायकवाड पाटील सीबीएसई शाळा बंद करण्याचा निर्णय शाळा प्रशासनाने घेतला होता. शाळेच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांसमोर प्रवेशाच्या अडचणी निर्माण झाल्या. त्यातही शिक्षण हक्क कायद्यांतर्गत प्रवेश घेतलेल्या २१ विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला होता.
या विद्यार्थ्यांना इतर कोणत्याही शाळेत प्रवेश मिळत नसून त्यांना प्रशासनाने वाऱ्यावर सोडल्याची टीका करण्यात येत होती. या विद्यार्थ्यांच्या पालकांनीही समायोजनासंदर्भात शिक्षण विभागाकडे मागणी केली होती. त्यानुसार, आता या विद्यार्थ्यांचे समायोजन केले जाणार आहे.
आरटीईअंतर्गत प्रवेश घेतलेले विद्यार्थी हे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील असतात आणि त्यांच्याकरिता विविध शाळांमध्ये २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात. त्यांच्या शिक्षणशुल्काची प्रतिपूर्ती शासनाकडून देण्यात येते. मात्र, शाळाच बंद पडल्याने राखीव जागांवर प्रवेश मिळालेल्या या विद्यार्थ्यांचे भवितव्य अडचणीत आले होते.
आता, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या विद्यार्थ्यांचे समायोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. या विद्यार्थ्यांना नजीकच्या शाळांमध्ये सामावून घेतले जाणार आहे. या समायोजनाचे आदेश सबंधित शाळांना देण्यात आले असून सबंधित पालकांनाही कळविण्यात आले असल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी राजश्री घोडके यांनी दिली.
शिक्षण विभागाने आरटीईतील विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडले असल्याची टीका याआधी करण्यात आली होती. या टीकेत कोणतेही तथ्य नसल्याचेही नागपूर जिल्हा शिक्षण विभागाने म्हटले आहे.