CET Cell: एकाच दिवशी दोन परीक्षा, विद्यार्थ्यांची होणार गैरसोय

म. टा. प्रतिनिधी, मुंबई

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी कक्ष) विधी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी प्रवेश परीक्षा आणि विद्यापीठाची बी. फार्मसी अभ्यासक्रमाची आठव्या सत्राची परीक्षा एकाचवेळी आली आहे. परिणामी एलएलबीला प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या बी. फार्मसीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यापीठाने बी. फार्मसीची परीक्षा पुढे ढकलावी, अशा मागणीचे निवेदन विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या कुलगुरूंना दिले आहे.

सीईटी कक्षाने तीन वर्षे वर्ष एलएलबी अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेचे २ मे आणि ३ मे रोजी आयोजन केले आहे. तर २ मे रोजी बी. फार्मसी अभ्यासक्रमाच्या शेवटच्या सत्राची परीक्षाही विद्यापीठाने जाहीर केली आहे. बी. फार्मसी अभ्यासक्रमाचा बायोस्टॅटिक्स रिसर्च मेथड हा पेपर २ मे रोजी सकाळी १०.३० ते १.३० वाजेदरम्यान पार पडणार आहे. त्याचे वेळापत्रक विद्यापीठाने १८ एप्रिल रोजी जाहीर केले.

मात्र विद्यार्थ्यांनी त्यापूर्वीच एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरले होते. दोन्ही परीक्षा एकाचवेळी येणार असल्याने विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे.

‘बी. फार्मसीची आणि एलएलबी तीन वर्षे सीईटी अभ्यासक्रमाची परीक्षा एकाचवेळी येणार असल्याने एक परीक्षा देता येणार नाही. बी. फार्मसीच्या अनेक विद्यार्थ्यांनी एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेसाठी अर्ज भरले आहेत. विद्यार्थ्यांना एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमाची सीईटी परीक्षा देता न आल्यास त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. विद्यापीठाने त्याची दखल घेऊन फार्मसी अभ्यासक्रमाची परीक्षा पुढे ढकलावी. यासाठी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूंना निवेदन दिले आहे’, अशी माहिती विद्यार्थी ऋषिकेश मुंढे याने दिली.

‘ही तर गोंधळात भर’

‘सीईटी सेलने एलएलबी तीन वर्षे अभ्यासक्रमाच्या परीक्षेचे वेळापत्रक दोन महिने आधी जाहीर केले होती. विद्यापीठाने १८ एप्रिल रोजी बी. फार्मसीची परीक्षा जाहीर केली. विद्यापीठाच्या गोंधळात भरीस भर म्हणून एलएलबी तीन वर्षे सीईटी परीक्षेवेळीच बी. फार्मसीची परीक्षा घेतली जाणार आहे. त्यातून विद्यार्थ्यांना एका परीक्षेला मुकावे लागणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी एक परीक्षा पुढे ढकलावी’, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते अॅड. अमोल मातेले यांनी केली आहे.

Source link

Career NewsCET CellCET examsCET Studentseducation newsMaharashtra TimesMHT CETदोन परीक्षाविद्यार्थ्यांची गैरसोय
Comments (0)
Add Comment