RTE Admission: तांत्रिक अडचणींमुळे प्रक्रिया संथ, आरटीई प्रवेशास मुदतवाढ

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

‘आरटीई’ची प्रवेशप्रक्रिया सध्या सुरू आहे. परंतु, संकेतस्थळावर येत असलेल्या तांत्रिक अडचणींमुळे प्रवेशनिश्चितीची प्रक्रिया अत्यंत संथ सुरू असल्याची तक्रार पालकांकडून होत होती. त्यामुळे शिक्षण विभागाने या प्रवेशप्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे.

ही प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन बारा दिवस झालेले असतानाही जिल्ह्यात अवघ्या ५१८ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेले आहेत. आज, मंगळवारी (दि. २५) प्रवेशनिश्चितीची अखेरची मुदत असतानाच शिक्षण विभागाने पुन्हा मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे आता संबंधित विद्यार्थ्यांना ५ मेपर्यंत प्रवेश निश्चित करता येणार आहेत.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यानुसार वंचित व दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षण हक्क अधिनियमांतर्गत २५ टक्के प्रवेशप्रक्रिया संपूर्ण राज्यात ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत शिक्षण विभागाने अर्ज मागविले होते. शहरातून जागांच्या तुलनेत तिपटीहून अधिक अर्ज प्राप्त झालेले असताना प्रत्यक्षात मात्र केवळ दहा टक्केच प्रवेश होऊ शकले आहेत.

प्रवेश घेताना संकेतस्थळावर येणाऱ्या असंख्य तांत्रिक अडचणींमुळे प्रवेशप्रक्रियाच पूर्ण करता येत नसल्याची तक्रार पालकांकडून व्यक्त केली जात होती. याबाबत शिक्षण विभागानेही आपली बाजू मांडताना पोर्टलवर अधिक भार येत असल्याने तांत्रिक अडचणी येत असल्याचे मान्य केले. त्याचबरोबर पालकांनी कोणताही संभ्रम न बाळगता पुन्हा प्रयत्न करण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

प्रवेशप्रक्रिया सुरू होऊन बारा दिवस झालेले असतानाही अद्याप जिल्ह्यात केवळ दहा टक्केच प्रवेश होऊ शकले आहेत. त्यामुळे आज प्रवेशनिश्चितीसाठीची अंतिम मुदत असतानाच शिक्षण विभागाने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

जिल्ह्यातील प्रवेशप्रक्रियेची स्थिती

शाळांची संख्या : ४०१

उपलब्ध जागा : ४,८५४

प्राप्त अर्ज : २१,९२३

निवड झालेले विद्यार्थी : ४,७५०

प्रवेश घेतलेले विद्यार्थी : ५१८

Source link

Maharashtra TimesRight to EducationRTERTE AdmissionRTE Date extendedRTE deadlineआरटीई प्रक्रियाआरटीई प्रवेशआरटीई मुदतवाढतांत्रिक अडचणी
Comments (0)
Add Comment