ठाण्यातील ‘इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड कम्प्युटर स्टडीज’ (आयएमसीओएसटी) कॉलेजच्या दोघा विद्यार्थ्यांना कॉलेज आणि विद्यापीठातील गोंधळाचा फटका बसला आहे. गेली तीन वर्षे हे विद्यार्थी गुणपत्रिकेसाठी कॉलेजच्या वाऱ्या घालत आहेत. त्याअभावी त्यांना नोकरीपासून वंचित राहावे लागत आहे. याबाबतची तक्रार आल्यानंतर मनविसेने कॉलेज व विद्यापीठाला निवेदन दिले आहे.
आयएमसीओएसटी या संस्थेतून कृतिका राठोड या विद्यार्थिनीने बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज हा तीन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला. मात्र तिचे दोन विषय राहिल्यामुळे तिला एटीकेटी लागली. या परीक्षेची गुणपत्रिका तिला मिळाली नाही. राहिलेले दोन विषय सोडविण्यासाठी तिने प्रयत्न केले, परंतु कॉलेजने नवीन अभ्यासक्रम सुरू झाला आहे, त्यानुसारच सर्व विषय घेऊन परीक्षा देण्यास सांगितले. त्यानुसार ऑक्टोबर २०२०मध्ये ऑनलाइन परीक्षा देऊन ती उत्तीर्णही झाली. परंतु विद्यापीठाने गुणपत्रिका देण्यास नकार दिला.
पहिल्या दोन वर्षांतील परीक्षा या जुन्या अभ्यासक्रमावर असल्याने तिसऱ्या वर्षातही जुन्या अभ्यासक्रमावर परीक्षा द्यावी, असे विद्यापीठाचे म्हणणे होते. तर, दोनच विषय घेऊन परीक्षा दिली असती तर गुणपत्रिका मिळाली असती, असेही तिला सांगण्यात आले. त्यामुळे विद्यापीठ आणि कॉलेजच्या चुकांमुळे गेल्या तीन वर्षांपासून कृतिकाला गुणपत्रिका मिळालेली नाही. असाच अनुभव मलायेल बवाचन या विद्यार्थ्यालाही आला आहे.
अखेर या विद्यार्थ्यांनी मनसेकडे तक्रार केली. गुणपत्रिका न मिळाल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून हे विद्यार्थी नोकरीपासून वंचित राहात असून त्यांची कौटुंबिक आर्थिक परिस्थितीही प्रतिकूल आहे. कॉलेजने विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक चुकीचे मार्गदर्शन केल्यामुळे दोन विषयांत अनुत्तीर्ण असूनही सर्व विषयांची परीक्षा द्यायला लावली. तसेच, तीन वर्षे गुणपत्रिका न देऊन त्यांचे अतोनात नुकसान केले आहे, याकडे मनसेने लक्ष वेधले आहे. संस्थेने तात्काळ गुणपत्रिका द्यावी अन्यथा मनसे तीव्र आंदोलन करेल तसेच, विद्यापीठाकडे संस्थेवर कठोर कारवाई करण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे मनविसे सरचिटणीस संदीप पाचंगे यांनी सांगितले.
कॉलेजकडे अद्याप विद्यापीठाकडून गुणपत्रिका न आल्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका देऊ शकलो नाही. विद्यार्थ्यांच्याही चुका असतात, काही गैरसमज होतात, परंतु संस्था विद्यार्थ्यांचे नुकसान करत नाही. आम्ही त्यांच्या गुणपत्रिका मिळविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. विद्यार्थ्यांकडून कॉलेजकडे जसा पाठपुरावा केला जातो, तसा त्यांनी विद्यापीठाकडेही करावा.
– डॉ. इर्शाद काझी, प्राचार्य, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अॅन्ड कम्प्युटर स्टडीज