महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या ‘गट ब’ आणि ‘गट क’ परीक्षेतील उमेदवारांच्या प्रवेशपत्रांबरोबर प्रश्नपत्रिकाही ‘लीक’ झाल्याचा दावा ‘एमपीएससी’कडून पुन्हा एकदा खोडून काढण्यात आला आहे.
‘एमपीएससी’कडून उमेदवारांना प्रवेशपत्रे देण्यासाठी तयार करण्यात आलेले संकेतस्थळ हॅकरने हॅक केले होते. मात्र, या संकेतस्थळांवर उमेदवारांच्या पीडीएफ स्वरूपातील प्रवेशपत्रांव्यतिरिक्त अन्य माहिती ‘लीक’ झाली नसल्याचे ‘एमपीएससी’ने जाहीर केले आहे.
‘एमपीएससी’कडून ३० एप्रिलला घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी सुमारे चार लाख ६६ हजार विद्यार्थी बसले आहेत. सर्व्हरवर अतिरिक्त ताण येऊ नये यासाठी अन्य संकेतस्थळाद्वारे ‘एमपीएससी’ने या परीक्षेची प्रवेशपत्रे उमेदवारांना उपलब्ध करून दिली होती. यातील मुख्य संकेतस्थळावरील बाह्यलिंक वेबपेजच्या कोडमध्ये छेडछाड करून हॅकरने उमेदवारांची प्रवेशपत्रे टेलिग्राम चॅनेलवर मिळवली.
ही बाब समोर आल्यानंतर एमपीएससीने प्रवेशपत्रांची बाह्यलिंक बंद केली. उमेदवारांची प्रवेशपत्रे मिळणे बंद झाल्यावर हॅकरने अन्य माहिती आणि प्रश्नपत्रिका मिळाल्याचा दावा केला. मात्र ‘एमपीएससी’ने हा दावा खोडून काढला आहे.
‘एमपीएससी’कडून आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या प्रश्नपत्रिका ऑनलाइन नाहीत. त्यामुळे कोणत्याही पद्धतीने प्रश्नपत्रिका मिळविणे शक्य नाही, असे ‘एमपीएससी’ने स्पष्ट केले आहे; तसेच हॅकरने हॅक केलेल्या बाह्यलिंकवर उमेदवारांच्या प्रवेशपत्रांव्यतिरिक्त अन्य माहिती नाही. त्यामुळे ही माहितीही ‘लीक’ झाली नाही, असेही ‘एमपीएससी’ने नमूद केले आहे. या प्रकरणी नवी मुंबईतील सी. बी. डी. बेलापूर पोलिसांनी गुन्हा नोंदविला आहे.
उमेदवारांची माहिती लीक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून (एमपीएससी) घेण्यात येणाऱ्या ‘गट ब’ आणि ‘गट क’ परीक्षेतील उमेदवारांची प्रवेशपत्रे लीक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. ‘एमपीएससी’कडून ३० एप्रिलला घेण्यात येणाऱ्या या परीक्षेसाठी बसलेल्या सुमारे ९० हजारपेक्षा अधिक उमेदवारांची माहिती लीक झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. या प्रकरणी ‘एमपीएससी’ने टेलिग्राम ग्रुपच्या अॅडमिनविरुद्ध सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
‘एमपीएससी’ने जानेवारी महिन्यात ‘गट ब’ आणि ‘गट क’ या पदाच्या आठ हजार १३९ जागांसाठी जाहिरात काढली होती. या भरतीसाठी राज्यभरातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सुमारे चार लाख ६० हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. ‘एमपीएससी’ने येत्या ३० एप्रिलला त्यांच्या पूर्व परीक्षेचे आयोजन केले आहे. मात्र, या उमेदवारांची प्रवेशपत्रे टेलिग्राम चॅनेलवरून प्रसारित करण्यात आली आहेत; तसेच प्रवेशपत्रांबरोबरच प्रश्नपत्रिका आणि अन्य माहितीही लीक केल्याचा संदेश या चॅनेलवरून पाठविण्यात आला आहे. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.