गौल्य माधुर्य रसाळे | तरी ते अपूर्वता ||
सोन्याला सुगंध आला आणि उसाला गोड, मधुर, रसाळ फळे लागली तर जी अपूर्वता ठरेल, दासबोधातील या ओवीतून आपल्याला दोन सद्गुणांच्या जोड्या एकत्र असल्यास काय होते हे समजते. जसे सोन्याला सुगंध असणे किंवा ऊसाला फळे असणे.
एखादी स्त्री सुस्वरुप असेल,पण निर्बुद्ध असेल तर आयुष्यातील महत्वाचे निर्णय पण ती चुकीचे घेईल. त्यामुळे सौंदर्यापेक्षा उत्तम विचार ही गोष्ट महत्वाची आहे. चातुर्य नसेल तर सौंदर्य काय कामाचे? संसार हा रुपाने नाही तर गुणाने होतो. पण जर एखादी सौंदर्यवती बुद्धीवंत असेल तर सोने पेसुहागा…असे म्हणतात.
परम ज्ञानी आणि भक्त…ज्ञानी मनुष्य सहसा भक्त असत नाही. असणारे अपवादात्मकच ! ज्ञानी मनुष्य आपल्या शास्त्रग्रंथाच्या अभ्यासामुळे अहंकारी बनतो. त्याच्या मनातील शरणागतीचा भावच नष्ट होऊन जातो, मग अशा व्यक्ती भगवंताला शरण जाऊ शकत नाहीत कारण त्यांचा अहं आड येऊ लागतो. पण जर अशी ज्ञानी व्यक्ती भक्त असेल तर आध्यात्मिक प्रगतीही लौकर प्राप्त करुन घेईल आणि इतरांनाही उत्तम पद्धतीने या मार्गावर येण्यास उद्युक्त करेल. तसेच तपस्वी आणि शांत हे गुण अभावानेच आढळतात. पूर्वीच्या ऋषिमुनींनी केलेल्या तपश्चर्येच्या अनेक कथा आपण वाचतो आणि हे बहुतांश तपस्वी रागीट होते हे या कथांवरुन दिसून येते. तपामुळे अंगी काही सिद्धी प्राप्त होतात. पण या सिद्धी प्राप्त झाल्या की,मी कुणीतरी असामान्य आहे,असा अहंकार मनात निर्माण होऊन इतरांकडून काही चूक झाली की लगेच त्यांना आपल्या तप सामर्थ्याने शाप देऊन मोकळे होतात. यासाठी मग तपच करायचे नाही का? तर असे नाही. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी नामस्मरण,जप आवश्यक आहे. पण हे करत असताना आपली साधना फलद्रूप होऊ लागली व सिद्धी प्राप्त झाल्या तर ती भगवंताचीच कृपा आहे हे समजून भगवंतचरणीच लीन व्हावे. साधनेमुळे आपला अहं वाढत नाही ना यासाठी अखंडपणे दक्ष असावे. नाहीतर पुन्हा आहे त्या पायरीवर गच्छंती ठरलेलीच असते.