आरटीईअंतर्गत प्रवेश घेण्यासाठी अनेक पालकांची धडपड सुरू असते. मात्र, प्रत्यक्ष प्रवेश घेताना पालकांनी थंड प्रतिसाद दिला असल्याचे चित्र नागपूर जिल्ह्यात दिसून येत आहे. पहिल्या फेरीत निवड झालेल्या ६ हजार ५१३ विद्यार्थ्यांपैकी केवळ २८७ विद्यार्थ्यांनी मुदत संपेपर्यंत प्रवेश निश्चित केले आहेत. अत्यंत कमी प्रवेश झाल्याने या प्रकियेला आता ८ मेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत विविध वर्गांमध्ये शिक्षण विभागाच्यावतीने प्रवेशप्रक्रिया राबविण्यात येते. आरटीई प्रवेशांची ही प्रक्रिया सध्या राज्यभरात सुरू आहे. अर्ज सादर केलेल्यांपैकी ज्या विद्यार्थ्यांची प्रवेशांसाठी निवड झाली त्यांना शिक्षण विभागाच्यावतीने मोबाइल संदेश पाठविण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांची निवड ज्या शाळेत झाली आहे त्याकरिता १३ ते २५ एप्रिलदरम्यान प्रवेश घेण्यास मुदत देण्यात आली होती. ही मुदत मंगळवारी संपणार आहे.
मात्र, अद्याप मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांचे प्रवेश विविध कारणांमुळे झालेले नाहीत. या विद्यार्थ्यांना निवड झालेल्या शाळांमध्ये प्रवेश घेण्याची संधी मिळावी, याकरिता प्रवेशांसाठीच्या कालावधीला मुदतवाढ देण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. ५ एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या सोडतीतून निवड झालेल्या विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे. या यादीत समावेश असलेल्या विद्यार्थ्यांना आता ८ मेपर्यंत प्रवेश घेता येणार आहे. विद्यार्थ्यांची निवड झालेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या पालकांना दिलेल्या कालावधीत प्रवेश घ्यावयाचा आहे.
जिल्ह्यातील ६५३ शाळांमध्ये ६ हजार ५७७ जागा आरटीईअंतर्गत राखीव ठेवण्यात आल्या आहेत. त्याकरिता ३६ हजार ४९० विद्यार्थ्यांचे अर्ज शिक्षण विभागाला प्राप्त झाले होते. त्यापैकी ६ हजार ५१३ विद्यार्थ्यांची निवड पहिल्या फेरीत करण्यात आली. मात्र, २५ एप्रिलपर्यंत केवळ २८७ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतले आहेत. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये कमी प्रवेश झाले आहेत.