मुंबई विद्यापीठाने तीन वर्षे विधी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राच्या परीक्षेत गैरहजर दाखविलेल्या काही विद्यार्थ्यांचा निकाल महिना उलटल्यानंतरही अद्याप जाहीर झालेला नाही. यातील काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका विद्यापीठाला सापडतच नसल्याची स्थिती आहे. या उत्तरपत्रिका नक्की गेल्या कुठे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
मुंबई विद्यापीठाने विधी अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राची परीक्षा डिसेंबरमध्ये घेतली. तिचा निकाल विलंबाने जाहीर केला. या निकालातही गोंधळ घालत विद्यापीठाने अनेक विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविले. ‘महाराष्ट्र टाइम्स’ने हे वृत्त दिले होते. त्यानंतर विद्यापीठाने आत्तापर्यंत तीन वेळा निकाल जाहीर केला. त्यामध्ये गैरहजर दाखविलेल्या काही विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका शोधून निकाल लावला. मात्र विद्यापीठाला अद्याप १० विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका सापडत नाहीत, असे सूत्रांकडून समजते. उत्तरपत्रिकाच सापडत नसल्याने निकाल कसा लावला जाणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
‘विद्यापीठाने जाहीर केलेल्या एलएलबी सत्र ५ अभ्यासक्रमाच्या निकालात अनेक विद्यार्थ्यांना गैरहजर दाखविले. याला महिना उलटल्यानंतरही विद्यापीठाने अद्याप चूक दुरुस्त केली नाही. १० विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका सापडत नाहीत. या उत्तरपत्रिका कुठे गेल्या, हा प्रश्न आहे. विद्यापीठाच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना फेऱ्या माराव्या लागत आहेत. तसेच नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. विद्यापीठाने ही चूक तत्काळ दुरुस्त करावी,’ अशी मागणी युवा सेनेचे (शिंदे गट) उपसचिव सचिन पवार यांनी केली. ‘विद्यार्थ्यांनी चुकीचे आसन क्रमांक आणि बारकोड टाकले आहेत. या विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका शोधून निकाल लवकरच जाहीर केला जाईल,’ असे स्पष्टीकरण विद्यापीठाने दिले.
‘एक विद्यार्थी चार पेपरला गैरहजर’
विद्यापीठाने एका विद्यार्थ्याला चार पेपरसाठी गैरहजर दाखविले. विद्यार्थ्याने स्वतः परीक्षा केंद्रावर फेऱ्या मारून ही हजेरी विद्यापीठाला पाठविली. मात्र विद्यापीठाने तिसऱ्यांदा २० एप्रिलला लावलेल्या सुधारित निकालात पुन्हा एकदा या विद्यार्थ्यासह अनेकांना गैरहजर दाखविले. त्यातून आता पाचव्या सत्राचा निकाल लागणार की नाही, या संभ्रमात विद्यार्थी आहे. आता विद्यापीठ या विद्यार्थ्यावरच घडल्या प्रकाराची जबाबदारी झटकून चुकीचा क्रमांक नोंदविल्याचा आरोप करत आहे. ‘एका पेपरमध्ये चुकीचा क्रमांक लिहिला जाईल. हे प्रत्येक पेपरमध्ये होणे शक्य नाही. मात्र आता अधिकारी आमच्यावरच जबाबदारी ढकलून देत आहेत. तसेच स्पष्ट माहिती देत नाहीत,’ असे विद्यार्थ्याने नमूद केले.