NEP:‘नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाची (एनईपी) अंमलबजावणी करताना कोणत्याही अभ्यासक्रमात बदल करण्यात येणार नाही. त्यामुळे पालकांनी याबाबत कोणताही संभ्रम मनात ठेऊ नये. पुढील वर्षापासून दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत, ही अफवाच आहे. अभ्यासक्रमात बदल न करता त्यात व्यावसायिक अभ्यासक्रमाचा अंतर्भाव केला जाणार आहे,’ अशी माहिती शालेय शिक्षणमंत्र्यांनी दिली.
राज्यात शिक्षण क्षेत्रात बदलाचे वारे वाहत असून, नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाची अंमलबजावणी येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत आहे. ‘एनईपी’नुसार शाळांच्या शिक्षण पद्धतीत, अभ्यासक्रमात, गुणांकन पद्धतीत, बोर्डाच्या परीक्षांमध्ये बदल होणार आहेत. त्या वेळी दहावी, बारावीचे बोर्ड रद्द होणार का? शाळांना अकरावी आणि बारावीचे वर्ग सुरू करावे लागणार का? शाळेकडे जागा नसेल, तर काय करायचे? शाळांनी अंगणवाड्या कशा सुरू करायच्या? यांसह अनेक शंकांनी पालक आणि शिक्षकांच्या मनात काहूर माजवले होते.
शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी या प्रश्नांची स्पष्ट उत्तरे देऊन विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या मनातील संभ्रम दूर केला. ‘पुढील वर्षापासून दहावी, बारावीच्या परीक्षा होणार नाहीत, ही अफवाच आहे. असा कोणताही निर्णय झाला नाही. त्यामुळे पालकांनी त्यावर विश्वास ठेवू नये. उलट दहावी, बारावीप्रमाणे इयत्ता आठवीच्या परीक्षा घेण्याचा आमचा विचार सुरू असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे,’ असेही केसरकर यांनी नमूद केले.
यंदा अंमलबजावणी अशक्य
‘सध्या राज्य सरकारकडून ‘एनईपी’च्या अनुषंगाने बदल करण्यासाठी २९७ ‘टास्क’वर काम सुरू आहे. सरकारने नेमलेल्या समित्या सूचना मागवून अहवाल तयार करत आहेत. सरकारच्या समित्यांनी आराखडे तयार केल्यानंतरच ‘एनईपी’ची अंमलबजावणी सुरू होईल. त्यामुळे प्रत्यक्ष वर्गात ‘एनईपी’नुसार यंदा बदल होणार नाहीत, असे शिक्षण विभागातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नमूद केले.