अकरावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतल्यानंतर ‘जेईई’, ‘सीईटी’ आणि ‘एनईईटी’ (नीट) परीक्षांची तयारी आतापासूनच कशी करायची, अभ्यासाचे नियोजन कसे असायला हवे, सायन्समधील करिअरचे विविध मार्ग कोणते, अशा अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे नुकतीच विद्यार्थी आणि पालकांना मिळाली. विज्ञानाच्या विषयांच्या अभ्यासाविषयीच्या विविध सोप्या पद्धती जाणून घेतल्यानंतर विद्यार्थी आणि त्यांचे पालक एका अर्थाने तणावमुक्त झाल्याचे दिसून आले.
निमित्त होते, ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ आणि ‘लर्न अॅक’ संस्थेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन सत्राचे. या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना विज्ञान विषयातील तज्ज्ञ प्राध्यापकांनी मार्गदर्शन करीत त्यांच्या शंकांचे निरसन केले. डॉ. निनाद शेवडे, सुनील कुलकर्णी, डॉ. आशुतोष सुळे, समुपदेशक डॉ. शिरिषा साठे आदी मार्गदर्शक सत्रात सहभागी झाले होते. फिजिक्स विषयाचे अनुभवी प्राध्यापक डॉ. निनाद शेवडे यांनी विद्यार्थ्यांना अकरावीला कोणते विषय घ्यावेत, यासंदर्भात मार्गदर्शन केले. ‘पूर्वी घोका आणि ओका’ अशी पद्धत अभ्यासात वापरली जायची. नव्या शिक्षण पद्धतीमध्ये ही पद्धत लागू पडणार नाही. विद्यार्थ्यांना शिकवला जाणारा प्रत्येक अभ्यासक्रम समजून घेऊन तो प्रत्यक्षात आणता आला पाहिजे. त्या पद्धतीने विद्यार्थ्यांना तयारी करावी लागेल,’ असे शेवडे यांनी सांगितले. इंजिनीअरींगसाठी द्यावी लागणाऱ्या ‘सीईटी’बद्दलही त्यांनी मार्गदर्शन केले.
सुनील कुलकर्णी यांनी ‘जेईई’विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, ‘जेईई केवळ आयआयटीमध्ये प्रवेश घेण्यासाठी नाही. या परीक्षेमुळे पुण्यातील नामवंत कॉलेजांसह एनआयआयटीमध्येही प्रवेश मिळवणे शक्य आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या परीक्षेची कसून तयारी करावी. आयआयटीमध्ये प्रवेश मिळाला नाही, तर केलेला अभ्यास वाया जात नाही. एमसीक्यू सोपे जाण्यासाठी अॅनालिटिकल थिंकिंग, लॉजिकल सिक्वेन्सिंग, अॅक्युरसी इन कॅल्क्युलेशन्स या त्रिसूत्रीचा वापर करावा.’
डॉ. आशुतोष सुळे यांनी ‘नीट’विषयी माहिती दिली. ‘नीट देऊ इच्छिणारे विद्यार्थी गणिताकडे दुर्लक्ष करतात. तसे त्यांनी करू नये. कारण फिजिक्स या विषयाची भाषा ही गणित आहे. गणित उत्तम असेल, तर फिजिक्स शिकण्यात कोणत्याही अडचणी येत नाहीत,’ याकडे त्यांनी लक्ष वेधले. समुपदेशक डॉ. शिरिषा साठे यांनीही विद्यार्थ्यांच्या मानसिकतेविषयी पालकांशी संवाद साधला. ‘मुलांच्या मनातल्या गोष्टी समजून घ्या,’ असा सल्ला त्यांनी दिला.