नवी मुंबई महापालिकेच्या वतीने पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विविध घटकांतील २० हजार ४७ पात्र विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ वर्षाची शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली आहे. १५ कोटी ८१ लक्ष २० हजार इतकी रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता स्टेट बँक ऑफ इंडियाच्या महापालिका मुख्यालय शाखेत पाठविण्यात आली आहे. बँकेमार्फत विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात शिष्यवृत्तीची रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रामधील विविध घटकांतील इयत्ता पहिली ते महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना सन २०२१-२२ व सन २०२२-२३ या वर्षासाठी शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली होती. या दोन वर्षांच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी ३३ कोटी २५ लाख रुपयांची तरतूदही करण्यात आलेली आहे. शिष्यवृत्तीचा लाभ विद्यार्थ्यांना जलद मिळावा यादृष्टीने समाजविकास विभागाने कार्यवाही करण्याच्या महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशांनुसार, अतिरिक्त आयुक्त संजय काकडे यांच्या नियंत्रणाखाली नियोजन करण्यात आले. दोन वर्षासाठी प्राफ्त ७१ हजारहून अधिक अर्जांची पडताळणी, छाननी हे काम विहित वेळेत करण्याच्या दृष्टीने समाजविकास विभागाचे उपआयुक्त डॉ. श्रीराम पवार यांनी समाजसेवा अधिकारी सर्जेराव परांडे व इतर कर्मचाऱ्यांच्या सहयोगाने कालबद्ध आखणी केली. त्यामुळेच सन २०२१-२२ ची २० हजार ४७ पात्र विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती वितरण प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेसाठी सन २०२१-२२ साठी ३४,३१८ तसेच सन २०२२-२३ या वर्षासाठी ३७,५५७ अशा प्रकारे दोन वर्षांसाठी एकूण ७१,८७५ अर्ज प्राप्त झाले आहेत. या अर्जांच्या नोंदणीचा अंतिम दिनांक २८ फेब्रुवारी २०२३ होता. दरम्यान, केवळ १५ दिवसांत जलदगतीने अर्जांची छाननी करून सन २०२१-२२ या वर्षासाठी २०,०४७ पात्र विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मंजूर करण्यात आली. त्यांच्या बँक खात्यात १५ कोटी ८१ लाख २० हजार इतकी शिष्यवृत्ती रक्कम जमा करण्याकरिता या पात्र लाभार्थ्यांची यादी व रक्कमेचा धनादेश स्टेट बँक ऑफ इंडिया, नमुंमपा मुख्यालय शाखा यांच्याकडे देण्यात येऊन लाभ वितरण प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली. याशिवाय दुसऱ्या टफ्फ्यातील सन २०२२-२३ या वर्षाच्या शिष्यवृत्तीकरिता प्राप्त ३७,५५७ विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती अर्जांची पडताळणी सुरू करण्यात आली असून २१,६७५ अर्जांची पडताळणी पूर्ण झाली आहे.