पीएचडीसाठीचा कोर्सवर्क अडचणीचा, नवे नियम ठरताहेत कठीण

म.टा. प्रतिनिधी, नागपूर

विद्यापीठ अनुदान आयोगाने दोन वर्षांपूर्वी पीएच.डी.च्या नियमांत बदल केला आहे. त्यामुळे संशोधकांना आता ‘स्वयम्’ पोर्टलवर ऑनलाइन अभ्यासक्रम पूर्ण करून त्यातून शंभर क्रेडिट पॉइंट्स जमा करावयाचे आहेत. मात्र, या पोर्टलवर विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांना महत्त्व देण्यात आल्याने भाषा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत असल्याची तक्रार विद्यार्थी करीत आहेत.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने या अभ्यासक्रमांमध्ये बदल करावा, अशी मागणी यापूर्वी अधिसभेत करण्यात आली होती. या मागणीला प्रशासनाने संमती दिली आहे. मात्र, विद्यापीठाने कोर्सवर्कमध्ये कुठलाही बदल केलेला नाही. या अभ्यासक्रमात मानव्यशास्त्र आणि आंतरशाखीय विद्यार्थ्यांना कोर्सवर्क करताना आणि क्रेडिट पॉइंटस मिळविताना अडचणी येत आहेत.

पहिले सहा क्रेडिट, मिळवण्यासाठी संशोधन कार्यप्रणाली आणि त्याच्याशी निगडित तीन अभ्यासक्रम पूर्ण करावयाचे आहेत. याशिवाय, राष्ट्रीय परिषद आणि चर्चासत्रांमध्ये सहभागी होऊनही हे क्रेडिटस प्राप्त करावयाचे आहेत. मात्र, ‘स्वयम् पोर्टल’चे अभ्यासक्रम हे आयआयटीमधील तज्ज्ञांनी तयार केले आहेत. त्यामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानाशी संबंधित अभ्यासक्रमांना प्राधान्य देण्यात आले आहे. पर्यायाने, या ‌विषयाच्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होत असला तरी मराठी, हिंदी, इंग्रजी आणि इतर मानव्यशास्त्र आंतरशाखीय विद्यार्थ्यांसाठी हा अभ्यासक्रम गैरसोयीचा ठरत आहे. हे अभ्यासक्रम, तसेच देण्यात येणारे प्रकल्प पूर्ण करावयाचे कसे, असे प्रश्न विद्यार्थ्यांसमोर निर्माण झाले आहेत.

दुसरीकडे संपूर्ण अभ्यासक्रम इंग्रजीत असल्याने मराठी माध्यमांच्या विद्यार्थ्यांना त्यातील काहीही कळत नसल्याचीही तक्रार पुढे आली आहे. त्यामुळे राज्यातील विद्यापीठांनी मराठीमध्ये हे अभ्यासक्रम सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली होती. इतर काही विद्यापीठांनी याची सुरुवात केली तर काही विद्यापीठांनी ‘कोर्सवर्क’मध्ये बदल करीत भाषा विषयांमध्ये ते उपलब्ध करून दिले.

नागपूर विद्यापीठानेही अशी सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी अधिसभा सदस्य डॉ. राजेश भोयर व डॉ. नितीन कोंगरे यांनी केली होती. याला विद्यापीठ प्रशासनानेही होकार दिला. मात्र, अद्यापही जुन्या अभ्यासक्रमात बदल न झाल्याने संशोधकांना त्रास सहन करावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.

‘क्रेडिट पॉईंट्स’मुळे संशोधनाला विलंब

विद्यार्थ्यांना सहा महिने ते एका वर्षात शंभर ‘क्रेडिट पॉइंट्स’ कमवायचे असल्याने यासाठी त्यांचा एका वर्षाचा कालावधी निघून जातो. नियमित विद्यार्थ्यांना तीन वर्षाच्या कालावधीमध्ये पीएच.डी.चा शोधप्रबंध पूर्ण करून तो सादर करावयाचा असतो. मात्र, सुरुवातीचा कालावधी हा स्वयम् पोर्टलवरील कठीण अभ्यासक्रमांमुळे ‘क्रेडिट पॉईंट्स’ कमविण्यात जात असल्याने शोधप्रबंध केव्हा करायचा, असाही प्रश्न विद्यार्थ्यांनी विचारला आहे.

Source link

Coursework for PhDdifficult PHD Rulesis difficult RulesMaharashtra Timesnew rulesनवे नियमपीएचडी कोर्सवर्कपीएचडी नवे नियम
Comments (0)
Add Comment