‘तुमची परीक्षा कालच झाली’, परीक्षा केंद्रात गेल्यावर विद्यार्थ्यांना बसला धक्का

म. टा. प्रतिनिधी, नाशिक

नाशिकमध्ये ‘बीएड सीईटी’ परीक्षेदरम्यान मोठा गोंधळ उडाल्याचे दिसून आले. विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रावर बुधवारी परीक्षा होणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र, परीक्षा केंद्रावर गेल्यानंतर ‘तुमची परीक्षा कालच झाली’ असे परीक्षा केंद्राकडून सांगण्यात आले. अचानक झालेल्या बदलामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ उडाला. अखेर आमदार सत्यजित तांबे यांच्या मदतीनंतर या सर्व विद्यार्थ्यांना शहरातील अन्य दोन महाविद्यालयांत परीक्षेसाठी हलविण्यात आले.

मागील काही दिवसांपासून राज्यभरात बीएड सीईटी परीक्षा सुरू आहेत. मात्र, या परीक्षांदरम्यान विविध तांत्रिक अडचणींना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. मात्र परीक्षा आयोजकांच्या ढिसाळ कारभारामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागत असल्याचे दिसून येत आहे. नाशिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एनआयटी) महाविद्यालयात बुधवारी सकाळी नऊ ते साडेदहा वाजण्याच्या दरम्यान बीएड सीईटी परीक्षेचे नियोजन केले होते. यातील बहुतेक विद्यार्थी नंदुरबार जिल्ह्यातील असून, मंगळवारी सायंकाळपासूनच परीक्षेसाठी नाशिकमध्ये दाखल झाले होते. परीक्षेसाठी परीक्षार्थींना सकाळी साडेसात वाजता परीक्षा केंद्रावर हजर राहण्याच्या सूचना असल्याने ७५ हून अधिक विद्यार्थी महाविद्यालयात दाखल झाले. मात्र, परीक्षा तेथे गेल्यानंतर परीक्षा केंद्र त्यांच्याच जिल्ह्यांत बदलण्यात आले असून, परीक्षाही मंगळवारीच झाल्याचे केंद्रांकडून सांगितल्यानंतर परीक्षा केंद्रावर प्रचंड गोंधळ उडाला. या सर्व परीक्षार्थींना जेएमसीटी महाविद्यालय आणि जेआयटी महाविद्यालयात पाठवित साडेबारा ते दोन या वेळेत या विद्यार्थ्यांची परीक्षा पार पडली. विशेष म्हणजे महिनाभरापूर्वी याच एनआयटी महाविद्यालयाच्याच परीक्षा केंद्रावर एमबीए सीईटी परीक्षेच्या प्रसंगीही गोंधळ उडाला होता.

सीईटी सेलचे स्पष्टीकरण

राज्यातील विविध केंद्रांवर २३ ते २६ एप्रिलदरम्यान परीक्षांचे नियोजन केले होते. परंतु, विद्यापीठाच्या परीक्षा सुरू असल्याने काही परीक्षा केंद्रे प्राप्त होऊ शकली नाही. त्यामुळे नवीन परीक्षा केंद्रांची निश्चिती करून सुमारे १५०० विद्यार्थ्यांची परीक्षा केंद्रे बदलली होती. याबाबत २१ एप्रिललाच परीक्षार्थींशी कॉल, मेसेज आणि इमेलद्वारे संपर्कही केला होता आणि त्यांना नवीन हॉल तिकीटही उपलब्ध करून दिले होते. परंतु, यातील काही परीक्षार्थींनी याकडे दुर्लक्ष केल्याने त्यांना समस्यांना सामोरे जावे लागले. याबाबत अगोदरपासूनच कल्पना असल्याने रद्द केलेल्या केंद्रांवर सीईटी सेलचे को-ऑर्डिनेटरही नेमले होते. त्यामुळे परीक्षेसाठी आलेल्या प्रत्येक उमेदवाराला परीक्षा देता आली असल्याची माहिती, सीईटी सेलच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांकडून दिली जात आहे.

कंत्राटदार कंपनीवर कारवाई करा

बीएड सीईटी परीक्षेचे नियोजन ‘एज्यु स्पार्क’ कंपनीकडे देण्यात आले आहे. जवळपास सर्वच परीक्षा केंद्रांवर तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे संबंधित कंत्राटदार कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.

अजब कारभार

– ७५ विद्यार्थ्यांना जेआयटी आणि जेएमसीटी महाविद्यालयांत हलवले

– सकाळी नऊचा पेपर साडेबाराला सुरू

– डमी युजर आयडीवरून घेतली परीक्षा

– भरउन्हात परीक्षार्थी आणि पालकांचीही दमछाक

– नातेवाइकांनी परीक्षा केंद्राच्या आवारातच घेतला आधार

– सर्वाधिक विद्यार्थी नंदुरबारचे

Source link

BEd CET examBED ExamBig commotionCareer NewsCET Exameducation newsMaharashtra TimesnashikNashik Examतुमची परीक्षापरीक्षा केंद्रविद्यार्थ्यांचा गोंधळ
Comments (0)
Add Comment