हायलाइट्स:
- भर वस्तीत रस्त्यावर एका ३२ वर्षीय तरूणाचा खून
- शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून नोंद केला गुन्हा
- हत्येच्या घटनेनं शहर हादरले
लातूर: शहरातील सद्गुरुनगरमधील राधाकृष्ण मंदिराच्या पाठीमागील भर वस्तीत रस्त्यावर एका ३२ वर्षीय तरूणाचा दोन जणांनी खून केला. ही खळबळजनक घटना मंगळवारी दुपारी ३ वाजताच्या दरम्यान घडली. याप्रकरणी एका आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
या घटनेतील मयताचे नाव गोकुळ मंत्री असं आहे. या हत्येनं लातूर शहर हादरले असून या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला आहे.
नेमकं काय घडलं?
दादोजी कोंडदेवनगर इथं राहणारा गोकुळ मंत्री हा आपल्या दुचाकीवरून मंगळवारी दुपारी सव्वा तीन वाजण्याच्या सुमारास घराबाहेर पडला होता. त्यासोबत २०-२२ वर्षीय दोन तरूण त्याच्याच दुचाकीवर बसून जात होते. त्याच तरूणांनी सद्गुरु नगरात आल्यानंतर राधाकृष्ण मंदिराच्या मागील वस्तीतील रस्त्यावर गोकुळ मंत्री याच्या शरीरावर, डोक्यात, पाठीत चाकू व कत्तीने जवळपास २० ते २५ सपासप वार करून निर्घृणपणे खून केला आणि मारेकऱ्यांनी तेथून पळ काढला.
या घटनेची माहिती मिळताच शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनिलकुमार पुजारी यांनी पोलिसांच्या ताफ्यासह घटनास्थळी हजर होऊन पंचनामा केला. तसंच मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला.
या प्रकरणी मयत गोकुळ मंत्री यांच्या पत्नी आकांक्षा मंत्री यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
दरम्यान, पोलिसांनी दोनपैकी एका आरोपीला अटक केली असून दुसऱ्या आरोपीचा शोध रात्री उशिरापर्यंत सुरू होता. मयत गोकुळ मंत्री यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली असा परिवार आहे. सदर खून किरकोळ वादातून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.
लातूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अशातच मंगळवारी खुनाची घटना भरदिवसा आणि भरवस्तीत घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.