अंबरनाथ पूर्वेतील लोकनगरी भागात असलेल्या एका खासगी शाळेत नववीतून दहावीत गेलेल्या विद्यार्थ्यांचे अतिरिक्त क्लास सुरू करण्यात आले होते. त्यानुसार दहावीच्या वर्गात शिक्षण घेत असलेले आणि अंबरनाथमधील वेगवेगळ्या परिसरात राहणारे चार विद्यार्थी मंगळवारी सकाळी घरातून शाळेसाठी निघाले होते, मात्र हे चौघे शाळेत पोहोचलेच नाहीत.
दुपारनंतर यातील एका विद्यार्थ्याच्या पालकांनी शाळेत धाव घेत आपल्या पाल्याबाबत विचारणा केली असता सदर विद्यार्थी तसेच त्याचे इतर तीन मित्र शाळेतच न आल्याची बाब समोर आली. इतर तीन विद्यार्थ्यांच्या पालकांनाही त्यांचे पाल्य शाळेत न आल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले.
धास्तावलेल्या पालकांनी विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण चारही विद्यार्थ्यांनी आपापले मोबाइल घरातच ठेवले होते. अखेर पालकांनी शिवाजीनगर पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत गुन्हा दाखल केला. त्यानुसार पोलिसांनी जिल्ह्यात तसेच राज्यातील विविध भागांत विद्यार्थ्यांच्या शोधासाठी यंत्रणा सक्रिय केली.
याच दरम्यान एका विद्यार्थ्याचा पालकांनी मोबाइल तपासला असता त्या विद्यार्थ्याने आपल्या एका मित्राला गोवा येथील कोणते हॉटेल चांगले आहे, याबाबत विचारणा केल्याचा मेसेज मिळाला. त्यामुळे पोलिसांनी तांत्रिक बाबींच्या मदतीने कोकण तसेच गोवा येथे या विद्यार्थ्यांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असता हे चारही विद्यार्थी गोवा येथे पिकनिकसाठी आल्याचे तपासात समोर आले.
गळ्यातील सोन्याच्या साखळ्या मोडून तसेच काही पॉकेटमनी खर्च करत हे विद्यार्थी गोव्यात पिकनिकचा आनंद घेत होते. अखेर पोलिसांनी या चारही मुलांना गोव्यातून ताब्यात घेतल्याची माहिती शिवाजीनगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक भागवत यांनी दिली.