सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातर्फे एम. फिल. अर्हताधारक अध्यापकांना नेट अर्हतेतून सूट दिली जाणार आहे. १४ जून २००६ पूर्वी विहित निवड समितीमार्फत नियुक्त व विद्यापीठाने नियमित मान्यता दिलेल्या एम. फिल. धारकांना ही सूट मिळणार आहे. त्यासाठी प्रस्ताव सादर करणे आवश्यक असून, २९ एप्रिलपर्यत मुदत दिलेली आहे.
पुणे विद्यापीठाने यासंदर्भात जाहीर केलेल्या सूचनापत्रात म्हटले आहे, विद्यापीठ अनुदान आयोगाने ५ सप्टेंबर २००९ रोजी पत्रक जाहीर करताना १४ जून २००६ पूर्वी एम. फिल. अर्हतेवर विहित निवड समितीच्या माध्यमातून नियुक्त झालेल्या व विद्यापीठाने नियमित मान्यता दिलेली असलेल्या, सेवेत असताना १ जानेवारी १९९४ ते ११ जुलै २००९ या काळात एम. फिल. ही अर्हता धारण केली, अशा अर्हताधारक अध्यापकांना नेट अर्हतेमधून सूट मिळणार असल्याचे नमूद केले होते.
मात्र, त्यासाठीचे प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाकडे सादर करणे आवश्यक आहे. त्यानुसार १४ जून २००६ पूर्वी विहित निवड समितीद्वारे नियुक्त एम. फिल. अर्हताधारक व विद्यापीठाने नियमित मान्यता दिलेली आहे तसेच अन्य अटींची पूर्तता होत असलेल्या अध्यापकांनी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन केले आहे.
अशा अध्यापकांचे प्रस्ताव २९ एप्रिलपर्यंत विद्यापीठातील शैक्षणिक विभागाच्या मान्यता कक्षाकडे सादर करावेत. तसेच प्रस्तावासोबत संबंधित अध्यापकांच्या नियुक्तीच्या अनुषंगाने साक्षांकित कागदपत्रे सादर करणे आवश्यक असणार आहे. यामध्ये शिक्षण सहसंचालक, उच्च शिक्षण यांच्याकडून प्राप्त झालेली पद मान्यता, बिंदू नामावली, जाहिरात, निवड समिती अहवाल, नियुक्ती आदेश, रूजू अहवाल, शैक्षणिक अर्हतेची सर्व कागदपत्रे यांसह शिक्षक मान्यता प्रत या कागदपत्रांचा समावेश आहे.