मुंबई विद्यापीठाने बीए तृतीय वर्ष सत्र ५च्या मानसशास्त्र विषयाच्या परीक्षेत पुन्हा एकदा गोंधळ घातला आहे. तब्बल १८ हून अधिक विद्यार्थ्यांना १०० गुण दिले आहेत, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला. तर नापास करताना एकाच कॉलेजमधील विद्यार्थ्यांना क्रमाने गुण दिल्याचा प्रकार समोर आला. विद्यापीठाच्या चुकीमुळे नापास दाखविल्याचा आरोपही विद्यार्थी करत आहेत.
रहेजा कॉलेजमध्ये मानसशास्त्र हा अभ्यासक्रम शिकणारे ३२ विद्यार्थी आहे. त्यातील काहींना साठे कॉलेज आणि रिझवी कॉलेज ही दोन परीक्षा केंद्रे आली होते. ही दोन परीक्षा केंद्रे मिळालेल्या विद्यार्थ्यांना जुन्या अभ्यासक्रमाचा ‘अॅबनॉर्मल सायकॉलॉजी’ विषयाचा पेपर दिला होता. विद्यापीठाने ३२ विद्यार्थ्यांपैकी ११ विद्यार्थ्यांना या एकाच विषयात नापास केले.
सात विद्यार्थ्यांना एकाच विषयात १०० गुण दिले, अशी माहिती एका विद्यार्थ्याने दिली. त्याचवेळी ज्या विद्यार्थ्यांना ‘अॅबनॉर्मल सायकॉलॉजी विषयात नापास करण्यात आले, त्यांना २६, २५, २४, १५, १६, १७, १८ आणि १७, १६, १५, १४, १३ असे एका क्रमाने गुण देण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना अन्य सर्व विषयांत ६५पेक्षा अधिक गुण मिळाले आहेत. अन्य विषयांत चांगले गुण मिळाले असताना एकाच विषयात नापास कसे, असाही प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केला.
अन्य कॉलेजमधील विद्यार्थ्यांनाही १०० गुण देण्यात आले आहेत. दीर्घोत्तरी लेखी परीक्षेत १०० गुण मिळणे शक्य आहे का, असा प्रश्नही विद्यार्थ्यांनी उपस्थित केला. दरम्यान, विद्यापीठाने तृतीय वर्ष मानसशास्त्र अभ्यासक्रमाच्या पाचव्या सत्राचा निकाल तब्बल १६८ दिवसांनी जाहीर केला.
सहाव्या सत्राची परीक्षा संपल्यानंतर हा निकाल जाहीर झाला. मात्र तोही सदोष असल्याने विद्यार्थ्यांनी नाराजी व्यक्त केली. याबाबत विद्यापीठ प्रशासनाकडे विचारणा करताच अद्याप विद्यार्थ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्या नाहीत. त्या प्राप्त झाल्यावर शहानिशा केली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.