राज्यातील अनेक सरकारी शाळांमध्ये इयत्ता नववी ते बारावीतील विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रम निवडण्याची मुभा देण्यात आली आहे. याद्वारे विद्यार्थ्यांना मुख्य विषयांसोबतच वैकल्पिक विषय म्हणून व्यावसायिक अभ्यासक्रम शिकता येतात. विद्यार्थ्यांचे शिक्षण मध्येच सुटल्यास त्यांना नोकरी मिळवण्यासाठी या अभ्यासक्रमांचा उपयोग होतो.
याद्वारे किरकोळ व्यापार क्षेत्रासाठी स्टोअर ऑपरेटर, सेल्स असोसिएट्स, तर ऑटोमोटिव्ह क्षेत्रासाठी ऑटोमोटिव्ह सर्व्हिस टेक्निशिअन आदी अभ्यासक्रम शिकविले जातात. यातून कौशल्याधारित शिक्षणावर भर देण्यात आला आहे. राज्यात २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात सुमारे ७१ हजार विद्यार्थ्यांनी हे कौशल्य शिक्षण घेतले.
आता इयत्ता सहावी ते आठवीतील विद्यार्थ्यांना नववीआधीच व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमांची ओळख व्हावी यासाठी व्यवसाय शिक्षण दिले जाणार आहे. समग्र शिक्षा अभियानाच्या माध्यमातून हा उपक्रम राबविला जाणार आहे. यातून नववीमध्ये प्रवेश घेतल्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडीनिवडीनुसार व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम निवडता येणार आहेत.
१३ व्यवसायांची माहिती
‘येत्या शैक्षणिक वर्षापासून सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी व्यवसायाभिमुख अभ्यासक्रमाची ओळख करून देण्यात येणार आहे. राज्यातील जिल्हा परिषदा, महापालिका आणि सरकारी अशा ६५ हजार शाळांतील विद्यार्थ्यांबरोबरच अनुदानित शाळांतील विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबविला जाईल. त्यातून विद्यार्थ्यांना १३ पद्धतीच्या विविध व्यवसायांची ओळख करून दिली जाईल’, अशी माहिती समग्र शिक्षा अभियानाचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी दिली.