विज्ञान, वाणिज्य आणि कला या पारंपरीक शाखांमध्ये पदवी घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पदवीबरोबरच ‘बीएड’चेही शिक्षण घेता येणार आहे. अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (एआयसीटीई) पारंपरिक पदवी आणि बीएडचे एकत्रीकरण करण्यास मंजुरी दिली असून, चार वर्षांचा एकात्मिक अभ्यासक्रम सुरू करण्याच्या सूचना उच्च शिक्षण संस्थांना दिल्या आहेत. या मुळे आता नव्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना ‘बीए बीएड’, ‘बीकॉम बीएड’ आणि ‘बीएससी बीएड’ असा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम शिकता येणार आहे.
या अभ्यासक्रमांमुळे आता पाच ऐवजी चार वर्षांमध्येच विद्यार्थी शाळांमध्ये शिक्षक म्हणून अध्यापन करण्यासाठी पात्र ठरू शकतात. सध्याच्या प्रचलित पद्धतीनुसार बारावीनंतर तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांनाच बीएडला प्रवेश मिळतो.
पदवीसाठी विद्यार्थ्यांना तीन वर्षे शिक्षण घ्यावे लागते. त्यानंतर दोन वर्षांचा बीएड अभ्यासक्रम शिकावा लागतो. मात्र, आता ‘एआयसीटीई’कडून पदवी आणि बीएड अभ्यासक्रम एकत्र करण्याची परवानगी मिळाल्याने चार वर्षांत पारंपरिक पदवीसह बीएडचे शिक्षण पूर्ण होणार आहे.
केंद्र सरकारच्या शालेय शिक्षण विभागाने एकात्मिक शिक्षक शिक्षण उपक्रम २०२१मध्ये सुरू केला होता. या उपक्रमांतर्गत पारंपरिक पदवी आणि बीएडचे शिक्षण एकत्रित करून चार वर्षांची एकच पदवी दिली जात होती. मात्र, हा अभ्यासक्रम काही मोजक्याच महाविद्यालये, विद्यापीठांमध्ये उपलब्ध होता. आता नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला अनुसरून अभ्यासक्रम देशभरातील सर्व बहुशाखीय शिक्षण देणाऱ्या महाविद्यालये, विद्यापीठांनी राबवावा, अशा सूचना ‘एआयसीटीई’ कडून देण्यात आल्या आहेत.
सीईटीचे काय होणार?
राज्यामध्ये बीएडच्या अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना सामायिक प्रवेश परीक्षा द्यावी लागते. पदवी अभ्यासक्रमानंतर ही परीक्षा देऊन विद्यार्थ्यांना ‘बीएड’ला प्रवेश मिळतात. मात्र, आता जर बारावीनंतरच ‘बीएड’सह पारंपरिक पदवी अभ्यासक्रम उपलब्ध झाला, तर त्याला सीईटी द्यावी लागेल का, असेल तर ती कधी द्यायची, या प्रश्नांची उत्तरे शोधावी लागणार आहेत.