‘विद्यार्थी राष्ट्राची संपत्ती आहे. त्यांना समृद्ध करण्यासाठी सातत्याने प्रयत्न व्हावेत. त्यासाठी मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात यावा,’ अशी सूचना शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केली.
लोणावळा येथील दि ॲम्बी व्हॅली सिटी येथे ‘समग्र शिक्षा व स्टार्स प्रकल्पा’च्या प्रभावी अंमलबजावणीबाबत आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे उद्घाटन केसरकर यांच्या हस्ते झाले. या वेळी ते बोलत होते. शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल, शिक्षण आयुक्त सूरज मांढरे, महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे संचालक कृष्णकुमार पाटील, प्राथमिक शिक्षण संचालनालयाचे संचालक शरद गोसावी, योजना संचालनालयाचे संचालक महेश पालकर आदी उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, ‘शिक्षकाने बदलत्या काळानुसार नवनवीन तंत्रज्ञान अवगत करावे. विद्यार्थ्यांना व्यावसायिक शिक्षण देऊन रोजगारक्षम पिढी निर्माण करावी. प्राथमिक शिक्षण आयुष्याचा पाया असून, त्या दृष्टीने पाया मजबूत करण्यासाठी प्रयत्न व्हावेत. प्रत्येक शाळेत ग्रंथालय, क्रीडांगण असावे. शिक्षणाच्या माध्यमातून संस्कारक्षम पिढी घडवावी.’
विद्यार्थ्यांना मातृभाषेतून शिक्षण, अंगणवाडी सेविकांना नर्सरीबाबत शिक्षण, शारीरिक शिक्षण, चित्रकला, गायन, नाट्य आदी कलाविषयक शिक्षण, विद्यार्थ्यांचा मानसिक अभ्यास, नावीन्यपूर्ण उपक्रम, भारतीय संस्कृतीचा अभ्यास, शिक्षण क्षेत्रासमोरील आव्हाने, उपाययोजना, नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी यांसारख्या विविध बाबींवर वैचारिक देवाण घेवाणही या कार्यशाळेत होणार आहे.
शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश
‘राज्य सरकारकडून शैक्षणिक क्षेत्राची प्रगती होण्यासाठी शिक्षण सेवकांच्या वेतनामध्ये वाढ, शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ, शालेय शिक्षणात कृषी विषयाचा समावेश, असे विविध धोरणात्मक निर्णय घेण्यात येत आहे. या निर्णयांची स्थानिक स्तरांवर प्रभावी अंमलबजावणी करावी. नावीन्यपूर्ण उपक्रमाचा शैक्षणिक क्षेत्रात उपयोग करावा आणि सामाजिक उत्तरदायित्व निधीचा वापर करून पायाभूत सुविधा अधिक भक्कम कराव्यात,’ असे आवाहन दीपक केसरकर यांनी केले.