कायदा विषयाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी सीईटी सेलच्या वतीने आयोजित लॉ सीईटी परीक्षेस मंगळवारपासून सुरुवात झाली. ही प्रवेश परीक्षा देऊन कायद्याचे शिक्षण घेऊ पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नपत्रिकेचा काठीण्यस्तर कसोटीचा ठरला.
या दोनदिवसीय परीक्षेत आज, बुधवारी (दि. ३) उर्वरित विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. गतवर्षी ही सीईटी लांबल्याने विद्यार्थ्यांची प्रवेशप्रक्रिया रखडली होती. यंदा मात्र ही परीक्षा वेळेत होत असल्याने प्रवेशप्रक्रुया सुरळीत पार पडण्याची अपेक्षा आहे. पदवीच्या पात्रतेनंतर तीन वर्षे कालावधीच्या विधी शाखेतील ‘एलएलबी’ अभ्यासक्रमाच्या सीईटी परीक्षेला मंगळवारी सुरूवात झाली. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने पार पडत आहे.
या परीक्षेमुळे मंगळवार सकाळपासूनच परीक्षा केंद्र गजबजली होती. इंग्रजीसह अन्य काही प्रश्नांची काठीण्यपातळी अधिक राहिल्याचे परीक्षार्थींनी सांगितले. नियोजित वेळापत्रकानुसार बुधवारी उर्वरित विद्यार्थी या परीक्षेला सामोरे जातील. सीईटी सेलतर्फे या परीक्षेचे नियोजन करण्यात आले आहे. दिवसभरात विविध सत्रांत ही परीक्षा पार पडत आहे.
परीक्षेपूर्वीच विद्यार्थ्यांच्या प्रवेश पत्रावर परीक्षेचा दिनांक, वेळ, परीक्षा केंद्राचे नाव पत्ता आदी तपशील उपलब्ध करून देण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल पर्सेंटाइल पद्धतीने जाहीर केला जाणार आहे.
दूरच्या केंद्रावर पोहोचताना दमछाक
लॉ सीईटीसाठी इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या जास्त असल्याने दोन दिवसांमध्ये विविध सत्रांत या परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, काही परीक्षा केंद्रे शहरात मध्यवर्ती ठिकाणी आहेत, तर काही केंद्रे शहराच्या हद्दीलगत दूर अंतरावर आहेत. या दूरच्या केंद्रांवर पोहोचण्यासाठी जिल्ह्याच्या विविध भागातून येणाऱ्या परीक्षार्थींची मात्र चांगलीच दमछाक झाल्याचे दिसले.