मुंबई विद्यापीठाचा विस्तार मागील दहा वर्षांत झपाट्याने वाढला आहे. विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध सरकारने सन २०१०मध्ये मंजूर केला. तेव्हा विद्यापीठासाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची १,३१९ पदे मंजूर केली होती. त्यावेळी विद्यापीठाशी संलग्न कॉलेजमध्ये जवळपास साडेचार लाख विद्यार्थी शिकत होते.
मात्र, गेल्या १३ वर्षांत विद्यापीठाशी संलग्न कॉलेज आणि विद्यार्थ्यांच्या संख्या झपाट्याने वाढली आहे. सद्यस्थितीत विद्यापीठाशी सुमारे ८०० कॉलेजे संलग्न असून, त्यामध्ये ८ लाखांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. विद्यार्थ्यांची संख्या वाढत असताना कर्मचाऱ्यांची संख्या मात्र घटताना दिसत आहे. विद्यापीठात २०१३ नंतर कर्मचाऱ्यांची भरती झाली नाही. त्यातून सध्या विद्यापीठाचा कारभार केवळ ६४३ कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर सुरू आहे. त्यातच दर महिन्याला ५ ते ६ कर्मचारी सेवानिवृत्त होत असल्याचे अधिकारी सांगतात.
विद्यापीठाच्या कारभारात निर्णय प्रक्रियेत महत्त्वपूर्ण असलेली पदेच रिक्त आहेत. विद्यापीठाच्या आकडेवारीनुसार उपकुलसचिवांची सात पदे, सहाय्यक कुलसचिवांची ४८ पैकी ३५ पदे रिक्त आहेत. विद्यापीठातील ब गटातील वरिष्ठ लघुलेखकांची १५ पैकी १४ पदे रिक्त आहेत. तर क वर्गातील कनिष्ठ लिपिकांच्या २४८ मंजूर पदांपैकी केवळ ५३ जणच कार्यरत आहेत. कनिष्ठ लेखा लिपकाच्या ३७ पदांपैकी केवळ १ पदच भरण्यात आले आहे. मुख्य लिपिकांची ७१ पैकी २५ पदे रिक्त आहेत.
विद्यापीठातील अनुभवी आणि प्रशिक्षित कर्मचारी वर्ग घटत असल्याने त्याचा कारभारावरही परिणाम होत आहे. विद्यापीठात सुमारे ४५० हून अधिक अभ्यासक्रम शिकविले जात आहेत. त्यांच्या परीक्षांचे नियोजन, उत्तरपत्रिकांचे व्यवस्थापन करणे, निकाल लावणे, विद्यार्थ्यांची माहिती मिळविणे आदी कामे करताना यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागत आहे.
‘मुंबई विद्यापीठाकडे सुमारे आठ लाख विद्यार्थी शिकत असताना, पुरेसे कर्मचारी नसल्याने शिक्षणाचा खेळखंडोबा होत आहे. यातून विद्यार्थ्यांची वाताहत होत आहे. एनईपी राबविताना विद्यापीठाच्या गोंधळात भर पडणार आहे. त्यामुळे प्रशिक्षित नियमित कर्मचारी वर्ग भरल्यास हा कारभार सुरळीत होईल. त्यासाठी राज्य सरकारने तत्काळ रिक्त पदे भरावित,’ अशी मागणी माजी सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी केली आहे.
रिक्त पदांचा परिणाम काय?
– अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने एकाच अधिकाऱ्यावर अनेक पदांचा कार्यभार
– कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण. त्यातून कामे पूर्ण होण्यास विलंब
– अतिरिक्त ताणामुळे कामाच्या गुणवत्तेवर परिणाम
– विद्यार्थ्यांचे निकाल लागण्यास विलंब, परीक्षांचे वेळापत्रक बनविताना गोंधळ
– छोटी-मोठी कामे पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना चकरा मारण्याची वेळ
रिक्त पदांची संख्या
वर्गवारी मंजूर पदे रिक्त पद
गट अ – ९२ – ५६
गट ब – ७९ – ५७
गट क – ७२५ – ३८६
गट ड – ४२३ – १७७