हायलाइट्स:
- हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू ठेवण्याच्या वेळेत वाढ
- राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
- सरकारच्या निर्णयाने व्यावसायिकांना मोठा दिलासा
मुंबई : राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर निर्बंध शिथिल करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मंत्रिमंडळाची सह्याद्री अतिथीगृह इथं महत्त्वपूर्ण बैठक सुरू असून या बैठकीत हॉटेल आणि रेस्टॉरंटबाबत (Hotel and Restaurant) मोठा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यभरातील हॉटेल आणि रेस्टॉरंट रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
सध्या राज्यातील हॉटेल दुपारी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी आहे. मात्र ही वेळ वाढवून द्यावी, अशी मागणी गेल्या अनेक दिवसांपासून हॉटेल व्यावसायिकांकडून करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवरच सरकारने हॉटेल्स रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्याची परवानगी दिली असल्याची माहिती आहे. रात्री उशिरापर्यंत यासंदर्भातील आदेश जारी होण्याची शक्यता आहे.
बैठकीत आणखी कोणते निर्णय होणार?
करोनाचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना १५ ऑगस्टपासून मुंबईत लोकल प्रवासाची मुभा देण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. मात्र जलतरण तलाव, जीम व चित्रपटगृहे, नाट्यगृहे अद्याप बंद आहेत. हॉटेल्स, मॉलवर वेळेचे निर्बंध आहेत. त्यामुळं अर्थचक्र म्हणावे तसे गतीमान झालेले नाही. रोजगाराचा प्रश्नही कायम आहे. लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना या सर्वच ठिकाणी परवानगी द्यावी, अशी एक मागणी पुढं आली आहे. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी देखील काही दिवसांपूर्वी तसे संकेत दिले होते. त्याबाबत आजच्या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.